Hardik Pandya set to miss Mumbai Indians opening match in IPL 2025 : आयपीएल २०२५ चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. यंदा आयपीएलच्या १८ व्या हंगामातील पहिला सामना २२ मार्च रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर केकेआर विरुद्ध आरसीबी यांच्यात होणार आहे. तसेच या स्पर्धेतील दोन सर्वात मोठे प्रतिस्पर्धी चेन्नई आणि मुंबई यांच्यातील पहिली लढत २३ मार्च रोजी चेपॉक स्टेडियमवर होईल. पण त्याआधी मुंबईसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या या सामन्यात खेळणार नाही. नेमक कारण काय आहे जाणून घेऊया.
पहिल्याच सामन्यात हार्दिक पंड्या चेन्नईविरुद्ध खेळताना दिसणार नाही. कारण त्याच्यावर एका सामन्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघाला कर्णधार हार्दिक पंड्याशिवाय चेन्नई सुपर किंग्जचा सामना करावा लागणार आहे. आता प्रश्न असा आहे की हार्दिक पंड्यावर बंदी का घालण्यात आली आहे? हार्दिक पंड्यासाठी मागील हंगाम खूप वाईट राहिला होता. या हंगामातील शेवटच्या सामन्यात हार्दिक पंड्याच्या मुंबई संघाने षटकांची गती कमी राखली होती.
हार्दिक पंड्यावर का बंदी घातली?
खरं तर, गेल्या हंगामात, हार्दिकला तीनदा ओव्हर रेटसाठी दोषी ठरवण्यात आले होते. त्याच्या संघाला सर्व षटके वेळेवर टाकता आली नाहीत असे ३ वेळा घडले. गेल्या हंगामातील सामन्यात तिसऱ्यांदा ही चूक पुन्हा केल्यानंतर त्याला एका सामन्यात बंदी घालण्यात आली. पण मुंबई स्पर्धेतून बाहेर पडली होती, त्यामुळे त्याला ही शिक्षा भोगता आली नाही. आता त्याचा पहिला सामना आयपीएल २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध आहे आणि यामध्ये त्याला त्याची बंदीची शिक्षा पूर्ण करावी लागेल. त्यामुळे तो हा सामना खेळू शकणार नाही.
हार्दिक पंड्यासाठी मागचा हंगाम खूप वाईट होता. त्याच्या नेतृत्वाखाली, मुंबई इंडियन्स संघाने गट टप्प्यात १४ पैकी १० सामने गमावले. ती ४ विजयांसह पॉइंट्स टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर राहिली. त्याच वेळी, रोहितकडून कर्णधारपद काढून घेतल्यानंतर, पंड्याला चाहत्यांच्या रोषालाही सामोरे जावे लागले. एवढेच नाही तर शेवटच्या सामन्यातही तो सुटकेचा नि:श्वास टाकू शकला नाही. आता यंदाच्या हंगामातील पहिल्या सामन्यासाठी मुंबईला नवा कर्णधार शोधावा लागणार आहे.