कोलकाता : तीन सामन्यांपैकी दोनमध्ये पराभवाचा सामना करावा लागणाऱ्या गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्स संघासमोर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट सामन्यात गुरुवारी सनरायजर्स हैदराबादचे आव्हान असणार आहे. या सामन्यात कोलकाताचा प्रयत्न कामगिरी उंचावण्यासह विजय मिळवण्याचा असेल.
कोलकाताचा कर्णधार अजिंक्य रहाणेने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाकडून मिळालेल्या पहिल्या सामन्यातील पराभवानंतर घाबरण्याची गरज नसल्याचे म्हटले होते. मात्र, दोन पराभवांनंतर संघाचा आत्मविश्वास कमी झाल्याचे चित्र आहे. सर्वांचे लक्ष ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर असेल. कारण बंगळूरुकडून मिळालेल्या पराभवानंतर त्याच्यावर टीका झाली होती. फिरकीला अनुकूल खेळपट्टी तयार करण्यासाठी बंगाल क्रिकेट संघटनेवर दबाव आहे. सध्या बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष स्नेहाशीष गांगुली स्वत: खेळपट्टी देखरेखकारासह पाहणी करीत आहेत. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये खेळपट्टीमध्ये बदल झालेला पाहायला मिळू शकतो. हैदराबाद संघाकडे ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, अभिषेक शर्मा आणि हेन्रिक क्लासनसारखे आक्रमक फलंदाज आहे.
● वेळ : सायं. ७.३० वा.
● थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, जिओहॉटस्टार अॅप.