पीटीआय, लखनऊ

गेल्या सामन्यात विजय नोंदवलेले लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज हे संघ इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये आज, मंगळवारी आमनेसामने येणार आहेत. यावेळी दोन्ही संघांचे कामगिरीत सातत्य राखण्याचे लक्ष्य असेल.‘आयपीएल’च्या नव्या हंगामाला सुरुवात होऊन १० दिवस झाले असले, तरी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब संघाने आतापर्यंत केवळ एक सामना खेळला आहे. त्यात त्यांनी गुजरात टायटन्सला पराभूत केले होते. दुसरीकडे, ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनऊने आपल्या दोन सामन्यांपैकी एकात विजय मिळवला आहे. लखनऊचा संघ यंदाच्या हंगामात प्रथमच घरच्या मैदानावर सामना खेळणार असून त्यांचे पारडे जड मानले जात आहे. मात्र, पंजाब संघातील खेळाडूंची गुणवत्ता पाहता त्यांना कमी लेखण्याची चूक लखनऊचा संघ निश्चितपणे करणार नाही.

पंतला सूर गवसणार?

‘आयपीएल’ लिलावातील आजवरचा सर्वांत महागडा खेळाडू ठरलेल्या ऋषभ पंतला अद्याप चमक दाखवता आलेली नाही. लखनऊला पहिल्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव पत्करावा लागला. यात फलंदाज, यष्टिरक्षक आणि प्रामुख्याने कर्णधार म्हणून पंतची कामगिरी निराशाजनक ठरली. दुसऱ्या लढतीत लखनऊच्या संघाने दमदार पुनरागमन करताना निकोलस पूरन (७०), मिचेल मार्श (५२) यांची फलंदाजी आणि शार्दूल ठाकूरच्या (४/३४) गोलंदाजीच्या जोरावर सनरायजर्स हैदराबाद संघाला नमवले. मात्र, पंतने निराशाच केली. त्याला दोन सामन्यांत ० आणि १५ धावाच करता आल्या आहेत. त्यामुळे कामगिरी उंचावण्याचा त्याचा प्रयत्न असेल. लखनऊ येथील खेळपट्टी फिरकीपटूंना पूरक मानली जाते. त्यामुळे लेग-स्पिनर रवी बिश्नोईची कामगिरी निर्णायक ठरू शकेल.

श्रेयस, चहलवर मदार

‘आयपीएल’ लिलावात २६.७५ कोटी रुपयांच्या बोलीसह श्रेयस अय्यरला पंजाबने आपल्या ताफ्यात घेतले होते. त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध ४२ चेंडूंत नाबाद ९७ धावांची निर्णायक खेळी केली. आपली हीच लय कायम राखण्याचा त्याचा प्रयत्न असेल. शशांक सिंहने अखेरच्या षटकांत फटकेबाजी केली, तर सलामीवीर प्रियांश आर्यने ‘आयपीएल’ पदार्पणात २३ चेंडूंत ४७ धावांची खेळी करताना दमदार सुरुवात केली. गोलंदाजीत अर्शदीप सिंग आणि विजयकुमार वैशाख प्रभावी ठरले. लखनऊच्या संथ खेळपट्टीवर लेग-स्पिनर युजवेंद्र चहल पंजाबच्या फिरकी माऱ्याचे नेतृत्व करेल.