नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्स संघासमोर इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सचे आव्हान असणार आहे. यावेळी दिल्लीचा प्रयत्न सामन्याच्या मधल्या षटकांत फलंदाजांची कामगिरी उंचावण्यावर असेल.

दिल्लीला गेल्या चारपैकी दोन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुकडून मिळालेल्या पराभवाचाही समावेश आहे. त्यामुळे ‘प्लेऑफ’मधील आपले स्थान निश्चित करायचे झाल्यास आगामी सामन्यांमध्ये कामगिरी उंचवावी लागेल. दुसरीकडे, कोलकाताचे केवळ सात गुण आहेत. कोलकाताला गेल्या तीन सामन्यांत विजय मिळवता आलेला नाही व यातील एक सामना रद्द झाला. त्यामुळे दिल्लीविरुद्ध त्यांना विजय मिळवण्याशिवाय पर्याय नाही. या सामन्यात पराभूत झाल्यास त्यांची ‘प्लेऑफ’मध्ये पोहोचण्याची वाट आणखी बिकट होईल.

दिल्लीसाठी अभिषेक पोरेलने आक्रमक फलंदाजी केली आहे. मात्र, पुनरागमन करणाऱ्या फॅफ ड्युप्लेसिसला धिम्या खेळपट्टीवर अडचण निर्माण झाली. केएल राहुल सध्याच्या हंगामात दिल्लीसाठी सर्वात यशस्वी फलंदाज राहिला आहे. मात्र, बंगळूरुविरुद्ध त्याला फिरकीपटूंविरुद्ध धावा करण्यात अपयश आले. त्यामुळे कोलकाताच्या सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्ती या अनुभवी फिरकीपटूंविरुद्ध त्याला कामगिरी उंचवावी लागेल. कोलकाताकडे चांगले फिरकी गोलंदाज असल्याने ते दिल्लीसमोर आव्हान उभे करू शकतात. दिल्लीला करुण नायरकडून चांगल्या खेळीची अपेक्षा असेल.

● वेळ : सायं. ७.३० वा. ● थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, जिओहॉटस्टार अॅप.