पीटीआय, लखनऊ
मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे संघ इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट सामन्यात शुक्रवारी एकमेकांविरुद्ध खेळतील, तेव्हा चाहत्यांचे रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असेल. पाच जेतेपद मिळवणाऱ्या मुंबईसाठी या हंगामाची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांचे तीन सामन्यांतून केवळ दोनच गुण आहेत. भारतीय कर्णधार रोहित शर्माची लय मुंबईसाठी चिंतेचा विषय आहे. रोहितला आतापर्यंत अनुक्रमे ०, ८, १३ धावाच करता आल्या आहेत. अशीच काहीशी स्थिती लखनऊ संघाचा कर्णधार पंतची आहे.
पंतला तीन सामन्यांत मिळून १७ धावाच करता आल्या आहेत. आक्रमकतेसाठी ओळखला जाणारा पंत अधिक बचावात्मक फलंदाजी करत आहे. पंत आणि रोहित हे दोन्ही तारांकित फलंदाज लयीत नसल्याचा परिणाम त्यांच्या संघावरही होताना दिसत आहे. त्यामुळे या दोघांचाही मोठ्या खेळीची प्रतीक्षा संपविण्याचा प्रयत्न असेल.यंदाच्या हंगामात खेळपट्टी देखरेखकार (क्यूरेटर) आपल्या सूचनांकडे लक्ष देत नसल्याची काही संघांचे प्रशिक्षक व खेळाडूंची तक्रार आहे. लखनऊच्या एकाना स्टेडियमची खेळपट्टी फिरकीला अनुकूल मानली जाते. मात्र, लखनऊ आणि पंजाब यांच्यातील सामन्यासाठीची खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली ठरली होती. त्यामुळे खेळपट्टीचा योग्य अंदाज बांधणाऱ्या संघालाच विजयाची अधिक संधी असेल.
अश्वनी, सूर्यकुमारकडे लक्ष
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराच्या पुनरागमनाबाबत अद्याप स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. कोलकाता नाइट रायडर्स संघाविरुद्ध युवा वेगवान गोलंदाज अश्वनी कुमारने चमक दाखवली होती.
●अश्वनीने ‘आयपीएल’ पदार्पणातच चार बळी मिळवत मुंबईच्या विजयाचा मार्ग सुकर केला. यात अजिंक्य रहाणे आणि आंद्रे रसेल यांच्या बळीचाही समावेश होता.
●दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक-फलंदाज रायन रिकल्टननेही अर्धशतक साकारत छाप पाडली. मुंबईला सलग दुसरा विजय मिळवयाचा झाल्यास रोहित, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांना जबाबदारी घेऊन खेळावे लागेल. गोलंदाजीची भिस्त ट्रेंट बोल्ट, दीपक चहर आणि कर्णधार हार्दिक पंड्यावर असेल.
पूरन, मार्श, शार्दूलवर भिस्त
मुंबईप्रमाणेच लखनऊ संघालाही तीनपैकी एकच सामना जिंकता आला आहे. त्यांच्यासाठी वेस्ट इंडिजचा फलंदाज निकोलस पूरनची कामगिरी ही सकारात्मक बाब ठरत आहे. त्याने तीन सामन्यांत १८९ धावा केल्या आहेत. मात्र, त्याला मिचेल मार्श वगळता अन्य कोणाचीही साथ लाभलेली नाही. तसेच गोलंदाजी ही लखनऊसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. त्यामुळे शार्दूल ठाकूर आणि रवी बिश्नोई यांच्यावर अतिरिक्त दडपण आहे.
●वेळ : सायं. ७.३० वा. ●थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, जिओहॉटस्टार अॅप.