MI vs KKR live scored :मुंबई : सलग दोन सामन्यांतील निराशेनंतर कामगिरी उंचावत गुणांचे खाते उघडण्यासाठी मुंबई इंडियन्स संघ उत्सुक असून ‘आयपीएल’मध्ये आज, सोमवारी त्यांची कोलकाता नाइट रायडर्सशी गाठ पडणार आहे. मुंबईच्या संघाला यंदाच्या हंगामात प्रथमच वानखेडे स्टेडियम या आपल्या घरच्या मैदानावर खेळण्याची संधी मिळणार आहे.

मुंबईला पहिल्या दोन सामन्यांत अनुक्रमे चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स या संघांनी पराभूत केले. रोहित शर्माला अद्याप सूर गवसला नसून याचा मुंबईला मोठा फटका बसतो आहे. रोहितला पहिल्या सामन्यात खातेही उघडता आले नाही, तर दुसऱ्या सामन्यात तो केवळ आठ धावा करून बाद झाला. आता घरच्या मैदानावर त्याच्या कामगिरीत सुधारणा अपेक्षित आहे.

दुसरीकडे, कोलकाता संघाला सलामीच्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुकडून पराभव पत्करावा लागला होता. परंतु दुसऱ्या सामन्यात त्यांनी राजस्थान रॉयल्सविरुद्ध विजयी पुनरागमन केले.

मुंबईकर विरुद्ध मुंबई…

कोलकाता नाइट रायडर्स संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित हे मूळचे मुंबईकर असल्याने त्यांना वानखेडेची खेळपट्टी व येथील परिस्थितीची पूर्ण कल्पना आहे. याचा कोलकाता संघाला निश्चित फायदा होऊ शकतो.

● वेळ : सायं. ७.३० वा. ● थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस १, १ हिंदी, जिओहॉटस्टार.