IPL 2025 Retention Rajasthan Royals Team Players: संजू सॅमसनने राजस्थानचं खंबीरपणे नेतृत्व केलं आहे. प्रमुख फलंदाज आणि विकेटकीपर या नात्याने संजूकडेच राजस्थानची सूत्रं असतील हे स्पष्ट आहे. संजूच्या बरोबरीने धडाकेबाज सलामीवीर यशस्वी जैस्वालला राजस्थान ताफ्यात राखण्याची शक्यता आहे. भारतीय संघाचा भरवशाचा सलामीवीर झालेला यशस्वी राजस्थानसाठी हुकूमी एक्का आहे. राजस्थान संघव्यवस्थापनासमोर या दोघांव्यतिरिक्त आणखी कोणाला ताफ्यात राखायचं असा यक्षप्रश्न आहे.
अष्टपैलू रियान पराग, अनुभवी फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन आणि युझवेंद्र चहल यांच्यासह डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट असे एकापेक्षा एक सरस खेळाडू राजस्थानकडे आहेत. सध्याच्या घडीला टी-२० क्रिकेटमधील उत्कृष्ट फलंदाजांपैकी एक असलेला खेळाडू म्हणजे जोस बटलर आहे. पण बटलर गेल्या ३ महिन्यांपासून दुखापतीने त्रस्त आहे, त्यामुळे संघाच्या भविष्याचा विचार करता त्याला रिटेन करतील की नाही यात शक्यता आहे. त्याचबरोबर संघाचा फलंदाज ध्रुव जुरेल आणि फिरकीपटू युजवेंद्र चहल यांच्यासाठी राईट टू मॅच कार्ड वापरतील. अधिक खेळाडू रिटेन केल्यास लिलावात संघाला कमी रक्कम राहणार आहे. रिटेन्शन व्यतिरिक्त संघाकडे राईट टू मॅच वापरण्याचा अधिकार आहे.
टी२० वर्ल्डकप पटकावल्यानंतर प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपला. द्रविड आता राजस्थान रॉयल्सचे प्रशिक्षक असणार आहेत. टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमधील त्यांचे सहकारी विक्रम राठोड राजस्थानचे फलंदाजी प्रशिक्षक असणार आहेत. द्रविड याआधीही राजस्थान रॉयल्स संघाशी संलग्न होते. आता पुन्हा एकदा ते नव्याने संघबांधणी करुन राजस्थानला जेतेपदाच्या मार्गावर आणण्यासाठी सज्ज आहेत.