पीटीआय, बंगळूरु

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघ बुधवारी गुजरात टायटन्सविरुद्धच्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट सामन्यात आपल्या घरच्या मैदानावर उतरेल, तेव्हा बंगळूरुचे लक्ष्य आपली विजयी लय कायम राखण्याचे असेल. बंगळूरुने कोलकाता नाइट रायडर्सला ईडन गार्डन्सवर तर, चेन्नई सुपर किंग्जला चेपॉकवर नमवत या हंगामाला चांगली सुरुवात केली. बंगळूरुचा संघ चार गुणांसह गुणतालिकेत अग्रस्थानी आहे. दुसरीकडे, गुजरात संघाला पंजाब किंग्जकडून पराभूत व्हावे लागल्यानंतर त्यांनी दुसऱ्या लढतीत मुंबई इंडियन्सविरुद्ध विजय मिळवला. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यातील खेळपट्टी ही नेहमीच फलंदाजांना अनुकूल राहिली आहे. संघांनी तीनदा २६० हून अधिकची धावसंख्या येथे उभारली आहे. त्यामुळे गोलंदाजांसाठी हे मैदान नेहमीच आव्हानात्मक राहिले आहे. बंगळूरुची लय पाहता त्यांचे पारडे जड दिसत आहे. मात्र, गुजरात संघालाही कमी लेखण्याची चूक यजमान बंगळूरुचा संघ करणार नाही.

कोहली, सॉल्ट, पाटीदारकडे लक्ष

विराट कोहली आणि फिल सॉल्ट या दोघांनीही दोन सामन्यांत ९५ आणि ४५ धावांची भागीदारी केली आहे. त्यामुळे चिन्नास्वामी स्टेडियमवर हे दोघेही प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांसाठी अडचण ठरू शकतात. कर्णधार रजत पाटीदार व देवदत्त पडिक्कलकडूनही संघाला अपेक्षा असतील. बंगळूरुकडे जोश हेझलवूड आणि भुवनेश्वर कुमारसारखे गोलंदाज आहेत, जे धावांवर अंकुश घालण्यात सक्षम आहेत. दोघांनीही संघासाठी आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये योगदान दिले आहे. दोघांकडे चेंडू स्विंग करण्याची ताकद आहे. त्यामुळे गुजरातच्या फलंदाजांचा त्यांच्यासमोर कस लागेल.

गिल, साई सुदर्शन, रशीदवर मदार

गुजरात टायटन्स संघाकडे चांगले फलंदाज आहेत. कर्णधार शुभमन गिल आणि बी. साई सुदर्शन यांनी सलामीला संघासाठी धावा केल्या आहेत. त्यामुळे बंगळूरुविरुद्धही त्यांच्याकडून याच कामगिरीची अपेक्षा असेल. यासह संघाकडे ग्लेन फिलिप्स व राहुल तेवतियासारखे अष्टपैलू देखील आहेत. अनुभवी फिरकीपटू रशीद खान व आर. साई किशोर हे बंगळूरुच्या फलंदाजांची चिंता वाढवू शकतात. यासह गुजरातकडे कगिसो रबाडा आणि मोहम्मद सिराजसारखे वेगवान गोलंदाज आहेत. रबाडाने आतापर्यंत १४ डावांत चार वेळा कोहलीला बाद केले आहे.

● वेळ : सायं. ७.३० वा.

● थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, जिओहॉटस्टार अॅप.