वृत्तसंस्था, हैदराबाद

अडखळत्या सुरुवातीनंतर लयीत आलेल्या मुंबई इंडियन्स संघाचे वर्चस्व राखण्याचे लक्ष्य असून इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये आज, बुधवारी त्यांच्यासमोर सनरायजर्स हैदराबादचे आव्हान असेल. हैदराबाद येथील सपाट खेळपट्टीवर होणाऱ्या या सामन्यात मोठ्या धावसंख्येची अपेक्षा बाळगली जात आहे.

एकीकडे मुंबईची गाडी आता रुळावर आली असताना दुसरीकडे हैदराबादचा संघ अजूनही सातत्याच्या शोधात आहे. मुंबईला पहिल्या पाचपैकी केवळ एका सामन्यात विजय मिळवता आला होता. त्यामुळे मुंबईच्या खेळाडूंवर आणि संघ व्यवस्थापनावर बरीच टीकाही झाली. परंतु त्यानंतर त्यांनी खेळ उंचावला असून सलग तीन सामने जिंकले आहेत. यात हैदराबादवरील विजयाचाही समावेश आहे. हैदराबादला मात्र आतापर्यंत सात सामन्यांत मिळून केवळ दोन विजयांची नोंद करता आली आहे. त्यामुळे ‘प्ले-ऑफ’च्या शर्यतीत कायम राहायचे झाल्यास हैदराबादला विजयपथावर परतावे लागेल.

हैदराबादचा संघ तडाखेबंद फलंदाजीसाठी ओळखला जातो. मात्र, त्यांच्याकडे ‘प्लॅन बी’ म्हणजेच खेळण्याची दुसरी शैलीच नसल्याची अनेकदा टीका होते. यंदाच्या हंगामात याचा वारंवार प्रत्यय आला आहे. मुंबईविरुद्धही वानखेडे स्टेडियमच्या गोलंदाजीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर हैदराबादचे फलंदाज अडखळताना दिसले. तसेच कर्णधार पॅट कमिन्स आणि मोहम्मद शमी या तारांकित गोलंदाजांनाही लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. याचाच हैदराबादला फटका बसतो आहे.

दुसरीकडे, मुंबईसाठी रोहित शर्माची कामगिरी हा चिंतेचा विषय होता. परंतु आता ही चिंताही मिटली आहे. गेल्या सामन्यात त्याने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध ४५ चेंडूंत नाबाद ७६ धावा फटकावत आपल्याला सूर गवसल्याचे संकेत दिले. हैदराबाद येथील खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल मानली जाते. याचा पुरेपूर फायदा घेत पुन्हा मोठी खेळी करण्याचा रोहितचा प्रयत्न आहे. गेल्या तीन सामन्यांत मुंबईच्या अन्य खेळाडूंनीही योगदान दिले आहे. हेच सातत्य टिकवण्याचा मुंबईचा मानस असेल.

बुमराचे आव्हान

दुखापतीतून पुनरागमन केल्यापासून सामन्यागणिक जसप्रीत बुमराच्या कामगिरीत सुधारणा पाहायला मिळते आहे. हैदराबादविरुद्ध वानखेडेवर त्याने चार षटकांत केवळ २१ धावांत एक बळी मिळवला होता. त्यानंतर चेन्नईविरुद्ध चार षटकांत २५ धावा देत दोन गडी बाद केले. त्यामुळे बुमरापासून हैदराबादच्या फलंदाजांना सावध राहावे लागेल. बुमरा विरुद्ध अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड हे द्वंद्व पाहण्यासारखे असेल. अभिषेकने हैदराबादमध्ये झालेल्या गेल्या सामन्यात पंजाबविरुद्ध ५५ चेंडूंत १४१ धावा केल्या होत्या. आता पुन्हा तडाखेबंद फलंदाजीचा त्याचा प्रयत्न असेल. हैदराबादच्या मधल्या फळीची धुरा हेन्रिक क्लासन सांभाळेल.

तिलकसाठी संधी

मुंबई इंडियन्सचा डावखुरा फलंदाज तिलक वर्माला घरच्या मैदानावर खेळण्याची संधी मिळणार आहे. तिलक मूळचा हैदराबादचा असून गेल्या वर्षी या मैदानावर त्याने ३४ चेंडूंत ६४ धावा फटकावल्या होत्या. गेल्या वर्षीच्या सामन्यात हैदराबादने २७७ धावांची मजल मारल्यावर मुंबईने २४६ धावा केल्या होत्या. त्यामुळे आजच्या सामन्यातही आतषबाजी पाहायला मिळू शकेल. रोहित शर्माला सूर गवसला असून सूर्यकुमार यादव, रायन रिकल्टन आणि हार्दिक पंड्या यांनीही काही चांगल्या खेळी केल्या आहेत. गेल्या आठवड्यात या दोन संघांत वानखेडेवर झालेल्या सामन्यात विल जॅक्सने अष्टपैलू चमक दाखवत सामनावीराचा पुरस्कार मिळवला होता. त्यामुळे त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत.

● वेळ : सायं. ७.३० वा.

● थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, जिओहॉटस्टार अॅप.