पराभवाच्या वाटेवरून विजयाच्या लाटेवर परतणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जने सोमवारी दिमाखदार विजयाची नोंद केली. हीच विजयी घोडदौड कायम राखण्याच्या इराद्याने आयपीएलच्या सातव्या मोसमात बुधवारी चेन्नईचा संघ राजस्थान रॉयल्सला धक्का देण्यासाठी सज्ज झाला आहे.
दोन वेळा विजेत्या चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली डेअरडेव्हिल्सवर ९३ धावांनी दणदणीत विजय मिळवताना आपला आत्मविश्वास परत मिळवला आहे. दुसरीकडे पहिल्या आयपीएल स्पध्रेच्या विजेत्या राजस्थान रॉयल्सने विजयाने आपल्या हंगामाला प्रारंभ केला, परंतु त्यानंतर किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध मात्र हार पत्करली. दोन्ही संघांचे प्रत्येकी दोन सामने झाले असून, एक विजय आणि एक पराजयासह दोन गुण दोघांच्या खात्यावर आहेत.
चेन्नईची मदार आहे ती त्यांच्या खंबीर फलंदाजीवर. सुरेश रैनाने सोमवारी आयपीएलमधील आपले २०वे अर्धशतक साकारले. आयपीएलमधील एक किफायतशीर फलंदाज म्हणून असलेली ओळख डावखुऱ्या रैनाने पुन्हा एकदा सार्थ ठरवली. अनुभवी ब्रेन्डन मॅक्क्युलम आणि आणि मोठे फटके खेळणारा ड्वेन स्मिथ यांच्यावर सलामीची जबाबदारी आहे. फॅफ डय़ू प्लेसिस नेहमीच धोकादायक ठरतो, रवींद्र जडेजावर कधीही अवलंबून राहता येते. याचप्रमाणे कठीण समयी जबाबदारीने खेळणारा कर्णधार महेंद्रसिंग धोनी त्यांच्यासाठी नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावतो.
दुसरीकडे राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजची धुरा अजिंक्य रहाणे, स्टुअर्ट बिन्नी, कर्णधार शेन वॉटसन आणि संजू सॅमसन यांच्यावर आहे. स्टीव्हन स्मिथने पंजाबविरुद्धच्या लढतीत वेगवान धावा काढल्या होत्या. याशिवाय अभिषेक नायर आणि जेम्स फॉल्कनर यांच्यासारखे फलंदाज त्यांच्याकडे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा