राजस्थान रॉयल्स संघाने रविवारी रात्री रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या तोंडातून विजयाचा घास अक्षरश: हिरावून घेतला; परंतु मंगळवारी बंगळुरूसाठी त्या तुलनेत अधिक सोपा पेपर आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत तळाच्या स्थानावर असलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सशी त्यांचा सामना होणार आहे. त्यामुळे बंगळुरूच्या खात्यावर आणखी एका विजयाची सहज भर पडू शकेल.
स्टीव्हन स्मिथ आणि जेम्स फॉल्कनर यांच्या फटकेबाजीपुढे बंगळुरूने शरणागती पत्करली; परंतु दिल्ली डेअरडेव्हिल्सपासून त्यांना धोका नाही, कारण दिल्लीने मागील सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सकडून हार पत्करली होती. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील बंगळुरूचा संघ आता आव्हान टिकवण्यासाठी धडपडत आहे. आतापर्यंत झालेल्या नऊ सामन्यांपैकी सहा सामन्यांत त्यांनी पराभव पत्करला असल्यामुळे गुणतालिकेत ते सहाव्या स्थानावर आहेत; परंतु दिल्लीचा संघ आठ सामन्यांपैकी सात पराभव आणि दोन विजयांसह तळाच्या स्थानावर आहे. घरच्या वातावरणाचा लाभ घेण्यात दोन्ही संघ अपयशी ठरले.
आयपीएल लिलावामध्ये १४ कोटी रुपयांची बोली जिंकणाऱ्या युवराज सिंगने रविवारी त्या किमतीला न्याय देणारी खेळी साकारली. त्याने ३८ चेंडूंत ८३ धावांची धुवाधार खेळी केली; परंतु ख्रिस गेल आणि विराट कोहलीच्या अपयशी फलंदाजीचा प्रभाव बंगळुरूच्या कामगिरीतून जाणवत आहे. गेलने अद्याप प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर त्याच्या दर्जाला साजेसे हल्ले चढवले नाहीत; परंतु उर्वरित पाच सामन्यांत आपल्या वादळी खेळीने क्रिकेटरसिकांचे तो मनोरंजन करील अशी अपेक्षा आहे. त्या तुलनेत ए बी डी’व्हिलियर्सच्या बॅटमधून सातत्याने धावा निघत आहेत. किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान यांच्याविरुद्ध अनुक्रमे ५३ आणि ५८ धावा त्याने काढल्या.

Story img Loader