किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या पराभवाच्या धक्क्यातून सनरायजर्स हैदराबाद संघ अद्याप सावरलेला नसून, त्यांना रविवारी येथे आयपीएल क्रिकेट स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्ससारख्या बलाढय़ संघाच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे. उपान्त्य फेरी गाठण्यासाठी त्यांना विजय अनिवार्यच आहे.
हैदराबाद संघाने आतापर्यंत दहा सामन्यांमध्ये आठ गुण मिळविले आहेत. त्यांना अगोदरच्या दोन सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्स व किंग्ज इलेव्हनविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता.
हैदराबादने पंजाबविरुद्ध २०५ धावांचा डोंगर रचून अपेक्षा उंचावल्या होत्या. मात्र पंजाबने हे लक्ष्यही सहज पार करीत शानदार विजय मिळविला होता. त्यांच्या फलंदाजांनी हैदराबादच्या गोलंदाजांच्या चिंध्या उडविल्या होत्या.
कोलकाताविरुद्ध हैदराबादच्या डॅरेन सामी, डेल स्टेन, मोझेस हेन्रीक्स, भुवनेश्वरकुमार, इरफान पठाण, अमित मिश्रा, कर्ण शर्मा यांना प्रभावी गोलंदाजी करणे अनिवार्य आहे. फलंदाजीत एरॉन फिंच, डेव्हिड वॉर्नर, नमन ओझा, कर्णधार शिखर धवन यांना सातत्यपूर्ण कामगिरी टिकवावी लागणार आहे.
लागोपाठ दोन सामने जिंकल्यामुळे कोलकाता संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. बाद फेरीत स्थान मिळविण्यासाठी हैदराबादविरुद्धची लढत जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न राहील. दहा सामन्यांमध्ये त्यांचे दहा गुण झाले आहेत. कर्णधार गौतम गंभीर व रॉबिन उथप्पा यांनी फलंदाजीत सातत्याने चमक दाखविली आहे. त्यांना जॅक्वीस कॅलीस, मोर्न मोर्कल, युसूफ पठाण यांचीही फलंदाजीत साथ मिळेल अशी अपेक्षा आहे.