गेले ४५ दिवस थरारक, अनपेक्षित, अद्भुत सामन्यांची अनुभूती देणारी आयपीएल आता अखेरच्या टप्प्यावर येऊन विसावली असून, रविवारी होणाऱ्या अंतिम फेरीच्या खास सामन्यासाठी सारे क्रिकेटविश्व सज्ज झाले आहे. एकीकडे दोन्ही प्रतिस्पर्धी संघांमध्ये विजेतेपदासाठी चुरस असेल तर दुसरीकडे बॉलीवूडमध्ये चित्रपटांमधून प्रेमगीतात मश्गूल होताना पाहायला मिळालेले शाहरुख खान आणि प्रीती झिंटा एकमेकांसमोर उभे ठाकलेले पाहायला मिळतील. त्यामुळे या क्रिकेटच्या युद्धात कोणता बॉलीवूडपटू बाजी मारेल, याची उत्सुकता साऱ्यांना असेल. सामना कोणीही जिंकला तरी या सामन्यात खरपूस मनोरंजनाची हमी मात्र चाहत्यांना मिळू शकेल. सुरुवातीपासूनच धडाकेबाज सुरुवात करणारा किंग्ज इलेव्हनचा संघ पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचला असून त्यांची विजेतेपदाची ‘प्रीती’ फुलेल का, याची उत्सुकता साऱ्यांनाच असेल, तर दुसरीकडे दुसऱ्या अंतिम फेरीत दाखल झालेला कोलकात्याच्या संघाला विजेतेपदाची आस असेल. कोलकाताने गेल्या आठ सामन्यांमध्ये सलग विजय मिळावल्यामुळे आणि ‘क्वालिफायर-१’च्या सामन्यात पंजाबला पराभूत केल्याने त्यांचे मनोबल कमालीचे उंचावलेले असेल. पण पराभवातून बरेच काही शिकल्याचे पंजाबने दाखवून दिले असून अंतिम फेरीत पराभवाचे उट्टे काढण्यासाठी ते सज्ज झाले आहेत.
किंग्ज इलेव्हन पंजाब
बलस्थान
जॉर्ज बेलीच्या नेतृत्वाखाली संघाने सुरुवातीपासूनच दमदार कामगिरी केली असून कधीही सामना सोडलेला पाहायला मिळालेला नाही. ‘क्वालिफायर-२’च्या सामन्यात वीरेंद्र सेहवागसारखा धडाकेबाज फलंदाज फॉर्मात आल्याने संघाचे मनोबल कमालीचे उंचावलेले असेल. पंजाबला आतापर्यंत फलंदाजीची चिंता भेडसावलेली नाही. त्यामुळे फलंदाजी हे त्यांचे बलस्थान आहे.
कच्चे दुवे
गोलंदाजी हा पंजाबचा कच्चा दुवा समजला जातो. कारण ‘क्वॉलिफायर-२’च्या सामन्यात अवघ्या सहा षटकांमध्ये चेन्नईने शंभर धावा केल्या होत्या. त्यामुळे त्यांना गोलंदाजीमध्ये अधिक सुधारणा करणे आवश्यक आहे.
लक्षवेधी खेळाडू
ग्लेन मॅक्सवेल : स्पर्धेच्या सुरुवातीला झंझावाती फलंदाजीने मॅक्सवेलने साऱ्यांचेच लक्ष वेधले होते. त्याचे तडाखेबंद फटक्यांनी गोलंदाज घायाळ झालेले साऱ्यांनीच पाहिले आहे. पण गेल्या काही सामन्यांमध्ये त्याचा हरवलेला फॉर्म संघासाठी चिंतेची बाब आहे.
अक्षर पटेल : पंजाबच्या संघातील सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करणारा गोलंदाज म्हणजे अक्षर. आतापर्यंत त्याने कमी धावा देत प्रतिस्पर्धी फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला असून त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा संघाला अंतिम फेरीत असेल.
कोलकाता नाइट रायडर्स
बलस्थानप्रारंभी संघनायक गौतम गंभीर धावांसाठी तर संघ विजयासाठी झगडताना दिसत होते. गोलंदाजी हे संघाचे बलस्थान आहे. गोलंदाजीमध्ये फिरकीपटू सुनील नरिन हे त्यांचे मुख्य अस्त्र आहे. त्याला शकिब-अल-हसन, मॉर्ने मॉर्केल, पीयूष चावला आणि उमेश यादव चांगली साथ देत आहेत. त्यामुळे पंजाबला कमीत कमी धावात गुंडाळल्यास कोलकाता जेतेपद पटकावू शकते.
कच्चे दुवे
उथप्पा व कर्णधार गौतम गंभीर यांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली असली तरी त्यांच्या मधल्या फळीला अजूनही लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे जर हे दोन्ही सलामीवीर झटपट बाद झाले तर कोलकाताचा संघ अडचणीत येऊ शकतो.
लक्षवेधी खेळाडू
रॉबिन उथप्पा : आतपरयतच्या आयपीएल कारकिर्दीत सर्वोत्तम फॉर्मात असलेला उथप्पा ‘ऑरेंज कॅप’चा मानकरी ठरू शकतो. गेल्या दहा सामन्यांमध्ये त्याने जवळपास ४० धावांच्या सरासरीने फलंदाजी केली आहे.
सुनील नरिन : सर्वाधिक बळी मिळवणाऱ्यांच्या यादीत नरीन दुसऱ्या स्थानावर आहे. प्रत्येक सामन्यामध्ये त्याने भेदक मारा करत प्रतिस्पध्र्याना नाचवले आहे. त्यामुळे नरिनची गोलंदाजी सामना फिरवणारी ठरू
शकते.