अंतिम चौघांमध्ये स्थान मिळवण्यासाठी संघांचा आता युद्धपातळीवर लढा सुरू आहे. प्रत्येक विजय आणि पराजयामुळे गुणतालिकेत होणाऱ्या हालचाली आणि निव्वळ धावगतीवर आधारलेले अपूर्णाकातील समीकरण याकडे सर्वाचेच लक्ष लागले आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबला कसलीच चिंता करायची आवश्यकता नाही. सर्वाधिक १८ गुणांसह हा संघ गुणतालिकेतील अव्वल स्थानावर विराजमान आहे; परंतु राजस्थान रॉयल्सला मात्र ‘प्ले-ऑफ’मध्ये स्थान मिळवण्यासाठी उर्वरित दोन लढतींपैकी किमान एक लढत जिंकणे पुरेसे आहे. उरलेल्या दोन्ही लढती जर राजस्थानने गमावल्या, तर त्यांचे नशीब अन्य संघांच्या कामगिरीवर अवलंबून राहील.
बुधवारी रात्री किंग्ज इलेव्हन पंजाबने मुंबई इंडियन्सकडून हार पत्करली; परंतु तरीही त्यांच्या स्थानामध्ये कोणताही फरक पडलेला नाही. राजस्थान आणि कोलकाता नाइट रायडर्स या दोन्ही संघांनी १२ सामन्यांतून १४ गुण जमा केले आहेत; परंतु निव्वळ धावगतीआधारे राजस्थान तिसऱ्या तर कोलकाता चौथ्या स्थानावर आहे. पण आयपीएलच्या पहिल्या मोसमातील विजेत्या राजस्थानला ‘प्ले-ऑफ’मध्ये स्थान मिळवणे मुश्कील जाणार नाही, असे सध्या तरी चित्र आहे.
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात स्टीव्हन स्मिथ, अजिंक्य रहाणे आणि प्रवीण तांबे या तीन महत्त्वाच्या खेळाडूंना न खेळवण्याची रणनीती राजस्थानसाठी धोकादायक ठरली. त्यामुळे मुंबईने २५ धावांनी तो सामना जिंकला होता. त्या सामन्यात करुण नायर (४८), ब्रॅड हॉज (४०) आणि जेम्स फॉल्कनर (३१) यांनी आपल्या फलंदाजीचे योगदान दिले, परंतु ते अपुरे ठरले.
राज‘स्थाना’साठी लढा!
अंतिम चौघांमध्ये स्थान मिळवण्यासाठी संघांचा आता युद्धपातळीवर लढा सुरू आहे. प्रत्येक विजय आणि पराजयामुळे गुणतालिकेत होणाऱ्या हालचाली आणि निव्वळ धावगतीवर आधारलेले अपूर्णाकातील समीकरण याकडे सर्वाचेच लक्ष लागले आहे.
First published on: 23-05-2014 at 03:21 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 7 kings xi punjab vs rajasthan royals