आयपीएल ‘प्ले-ऑफ’मधील स्थानापासून विजयी घोडदौड करणारा कोलकाता नाइट रायडर्सचा संघ फक्त एका विजयाच्या अंतरावर आहे. ईडन गार्डन्सच्या घरच्या मैदानावर गुरुवारी होणाऱ्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला नमवून ‘प्ले-ऑफ’चा टिळा लावण्यासाठी कोलकाता उत्सुक आहे.
२०१२च्या आयपीएल मोसमात कोलकाता नाइट रायडर्सने जेतेपदाला गवसणी घातली होती. त्यावेळी सर्वाधिक सहा सामने कोलकाताने ईडन गार्डन्सवर जिंकले होते. त्या यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी कोलकाताचा संघ सज्ज झाला आहे. मंगळवारी रात्री कोलकाताने चक्क चेन्नई सुपर किंग्जसारख्या बडय़ा संघावर आठ विकेट राखून विजय मिळवला.
बेफाम फॉर्मात असलेल्या रॉबिन उथप्पाने ३९ चेंडूंत ६७ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले, तर शाकिब अल हसनने २१ चेंडूंत नाबाद ४६ धावा केल्या. फलंदाजांच्या या दमदार कामगिरीमुळेच कोलकाताला चेन्नईला हरवता आले.
आयपीएलच्या सातव्या मोसमातील गुणतालिकेने अव्वल चार आणि तळाच्या चार संघांमध्ये सध्या तरी चार गुणांचे अंतर ठेवले आहे. बंगळुरू आणि हैदराबाद या संघांना ‘प्ले-ऑफ’च्या आशा जरी असल्या तरी हे अंतर कमी करणे त्यांच्यासाठी खडतर असेल.
उथप्पा दोन वर्षांपूर्वी शेवटचा भारताच्या ट्वेन्टी-२० संघात दिसला होता. परंतु मागील सात डावांमध्ये त्याने अनुक्रमे ४७, ६५, ४७, ४६, ८०, ४० आणि ६७ धावा काढून अपेक्षा उंचावल्या आहेत. भारताच्या इंग्लंड दौऱ्यासाठी त्याने आपल्या सातत्यपूर्ण फलंदाजीनिशी सशक्त दावेदारी केली आहे. १२ सामन्यांत त्याच्या खात्यावर आता चार अर्धशतकांसह ४८९ धावा जमा आहेत. याशिवाय कर्णधार गौतम गंभीरसोबत त्याने दोनदा शतकी भागीदाऱ्या केल्या आहेत.
‘प्ले-ऑफ’चा टिळा लावण्यासाठी कोलकाताची आज अग्निपरीक्षा
आयपीएल ‘प्ले-ऑफ’मधील स्थानापासून विजयी घोडदौड करणारा कोलकाता नाइट रायडर्सचा संघ फक्त एका विजयाच्या अंतरावर आहे.

First published on: 22-05-2014 at 05:37 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 7 kolkata knight riders