पहिल्या हंगामापासून वादात राहणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्सचे आयपीएल विजेतेपदाचे स्वप्न साकारले ते गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली. याच पाश्र्वभूमीवर शाहरूख खानच्या मालकीच्या कोलकाता संघाचे कर्णधारपद गंभीरकडे सोपवले जाणार आहे. याचप्रमाणे वेस्ट इंडिजचा जादुई फिरकी गोलंदाज सुनील नरिनला संघात कायम ठेवण्यासाठी कोलकाताचा संघ आग्रही आहे.
आयपीएलच्या पहिल्या तीन हंगामांमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सचे प्रतिनिधित्व करणारा गंभीर २०११पासून कोलकाता नाइट रायडर्स संघाकडून खेळत आहे. २०१२मध्ये चेपॉक स्टेडियमवरील रोमहर्षक लढतीत चेन्नई सुपर किंग्जला नमवून कोलकाता नाइट रायडर्सने जेतेपदाला गवसणी घातली होती. तर २०११मध्ये त्याने संघाला बाद फेरीपर्यंत पोहोचवले होते. आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या गंभीरने ८८ सामन्यांत २४७१ धावा केल्या आहेत. याचप्रमाणे नरिनने आयपीएलच्या ३१ सामन्यांत ४६ बळी घेतले आहेत.
‘‘आगामी हंगामासाठी आम्ही गंभीरला संघात कायम ठेवणार आहोत. कोलकाता संघासाठी त्याचे नेतृत्व प्रेरणादायी ठरले आहे. कोलताना नाइट रायडर्सचा मोठ चाहतावर्ग गंभीरशी जोडला गेलेला आहे. त्यामुळेच त्याला आम्ही संघात कायम ठेवणार आहोत,’’ असे आयपीएलच्या सूत्रांकडून समजते.
‘‘आयपीएलमध्ये सुनील नरिनची कामगिरी प्रभावी झाली होती. बळी मिळवण्याची त्याची क्षमता आणि फलंदाजांवरील अंकुश हे नरिनचे महत्त्वाचे गुण आहेत,’’ असे पुढे कळते. मागील हंगामात कोलाकाता नाइट रायडर्सला बाद फेरी गाठण्यात अपयश आले होते. त्यांना सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.
आयपीएलमध्ये श्रीलंकेच्या खेळाडूंचा सहभाग अनिश्चित
नवी दिल्ली : आयपीएल स्पध्रेच्या सातव्या हंगामातील श्रीलंकेच्या खेळाडूंच्या सहभागाविषयी अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. मे महिन्यात श्रीलंकेचा संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार असून, त्याआधी तयारी म्हणून हा संघ आर्यलडशी दोन एकदिवसीय सामने खेळणार आहे. हे सामने अनुक्रमे ६ आणि ८ मे रोजी आयपीएलदरम्यान होणार आहेत. १३ फेब्रुवारीला आयपीएलमधील खेळाडूंचा लिलाव होणार आहे. परंतु आयपीएलसाठी श्रीलंकेच्या खेळाडूंना  परवानगी देणे श्रीलंका क्रिकेट मंडळाच्या हाती आहे. आर्यलडसारख्या सहसदस्य राष्ट्रासोबत छोटी मालिका खेळणे, या राष्ट्रीय जबाबदारीला श्रीलंकेने महत्त्व दिले तर खेळाडूंचा पेचप्रसंग निर्माण होऊ शकेल.

Story img Loader