राजस्थान रॉयल्सने आपले वर्चस्व प्रस्थापित करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फक्त ७० धावांत खात्मा केला आणि त्यानंतर सहा विकेट राखून आरामात विजयश्री साजरी केली. आयपीएलच्या इतिहासातील तिसऱ्या क्रमांकाची नीचांकी धावसंख्या बंगळुरूसारख्या दिग्गज फलंदाजांची फळी असलेल्या संघाच्या नावे लिहिली गेली.
फिरकी गोलंदाज प्रवीण तांबे (२० धावांत ४ बळी) राजस्थान रॉयल्सच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने कर्णधाराचा प्रथम गोलंदाजीचा स्वीकारण्याचा निर्णय सार्थ ठरवला. बंगळुरूच्या फक्त तीन फलंदाजांना दोन आकडी धावसंख्या करता आली.
योगायोगाची गोष्ट म्हणजे २००९मध्ये राजस्थान रॉयल्सची बंगळुरूने अशीच केविलवाणी अवस्था केली होती. त्या वेळी राजस्थान रॉयल्सचा डाव फक्त ५८ धावांत संपुष्टात आला होता. आयपीएलच्या इतिहासात ती सर्वात नीचांकी धावसंख्या नोंदली गेली.
राजस्थानने ७१ धावांचे तुटपुंजे लक्ष्य १३ षटकांत पार केले. कर्णधार शेन वॉटसनने सर्वाधिक २४ धावा केल्या, तर अजिंक्य रहाणेने २३ धावा केल्या.
त्याआधी, दिग्गज फलंदाजांचा समावेश असलेल्या बंगळुरूला पहिल्या षटकापासूनच हादरे बसले. स्टुअर्ट बिन्नीच्या पहिल्या षटकात योगेश ताकवले भोपळाही फोडू शकला नाही, तर पार्थिव पटेल धावचीत झाला. त्यामुळे २ बाद १ अशी त्यांची केविलवाणी अवस्था झाली. मग केन रिचर्डसनने तिसऱ्या षटकात युवराज सिंग (३) व ए बी डी व्हिलियर्स (०) यांना बाद करून ४ बाद ५ अशी केविलवाणी अवस्था केली. कर्णधार विराट कोहलीने जेमतेम २१ धावा काढून संघाला सावरण्याचा प्रयत्न केला.
संक्षिप्त धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : १५ षटकांत सर्व बाद ७० (विराट कोहली २१; प्रवीण तांबे ४/२०, केन रिचर्ड्सन २/१८) पराभूत वि. राजस्थान रॉयल्स : १३ षटकांत ४ बाद ७१ (अजिंक्य रहाणे २३, शेन वॉटसन २४; मिचेल स्टार्क २/२९)
सामनावीर : प्रवीण तांबे.
प्रवीण तांबे ४/२०

Story img Loader