भेदक गोलंदाजी आणि दर्जेदार फलंदाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात दिमाखदार विजय साकारला. दिल्लीने जे.पी.डय़ुमिनीच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर १४५ धावांपर्यंत मजल मारली होती. बंगळुरूने हे आव्हान कर्णधार विराट कोहली आणि युवराज सिंग यांच्या नाबाद दमदार खेळींच्या जोरावर ८ विकेट्स आणि २० चेंडू राखत पूर्ण केले आणि विजयी सलामी दिली. युवराजने या सामन्यामध्ये कोहलीनंतर येऊनही नाबाद अर्धशतक झळकावत संघाने केलेली निवड चुकीची नसल्याचे दाखवून दिले.
दिल्लीच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूला पहिला फलंदाज अवघ्या सहा धावांवर गमवावा लागला. पण त्यानंतर पार्थिव पटेल (३७) आणि कर्णधार विराट कोहली यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी रचत संघाला सुस्थितीत आणले. पटेल बाद झाल्यावर कोहलीने युवराज सिंगच्या साथीने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील संथ खेळीमुळे काही दिवसांपूर्वी टीकेचा धनी ठरलेल्या युवराजने २९ चेंडूंत ३ चौकार आणि ५ षटकारांच्या जोरावर नाबाद ५२ धावांची दणकेबाज खेळी साकारली, तर कोहलीने २ चौकार आणि ३ षटकारांच्या जोरावर नाबाद ४९ धावांची खेळी साकारली. कोहली आणि युवराज यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८४ धावांची अभेद्य भागीदारी रचली.
तत्पूर्वी, बंगळुरूने नाणेफेक जिंकत दिल्लीला फलंदाजीचा पाचारण केले आणि त्यांचा हा अचूक असल्याचे दिसून आले. बंगळुरूच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत दिल्लीचा ४ बाद ३५ अशी दयनीय अवस्था केली होती. पण त्यानंतर नाबाद अर्धशतकवीर डय़ुमिनी आणि रॉस टेलर यांनी पाचव्या विकेटसाठी ११० धावांची अभेद्य भागीदारी रचत संघाला १४५ धावांचा पल्ला गाठून दिला. डय़ुमिनीने यावेळी संघाला सावरत सन्मानजनक धावसंख्या उभारून देण्यात मोलाचा वाटा उचलला. डय़ुमिनीने ४८ चेंडूंत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या जोरावर नाबाद ६७ धावांची खेळी साकारत संघाची गाडी रुळावर आणली. टेलरने ४ चौकारांच्या जोरावर नाबाद ४३ धावांची खेळी साकारत डय़ुमिनीला चांगली साथ दिली. वरुण आरोनने भेदक मारा करत ३ षटकांत ९ धावा देत एक बळी मिळवला.
संक्षिप्त धावफलक
दिल्ली डेअरडेव्हिल्स : २० षटकांत ४ बाद १४५ (जे.पी.डय़ुमिनी नाबाद ६७, रॉस टेलर नाबाद ४३; वरुण आरोन १/९) पराभूत  वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : १६.४ षटकांत षटकांत २ बाद १४६(युवराज सिंग नाबाद ५२, विराट कोहली नाबाद ४९; मोहम्मद शमी १/३०).
सामनावीर : युजवेंद्र चहल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा