आयपीएलच्या ११व्या हंगामासाठी शनिवारी आणि रविवारी खेळाडुंचा लिलाव पार पडला. या लिलाव प्रक्रियेत सर्वच संघ मालकांनी सर्वोत्कृष्ट खेळाडुंना आपल्या संघात घेण्यासाठी भरपूर पैसे मोजले. आयपीएलचे तीन वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सनेही एकापेक्षा एक खेळाडू आपल्या संघात घेतले आहेत. पण संघ मालक नीता अंबानी यांना एका खेळाडुला आपल्या संघात घेता न आल्याचे खूप दु:ख आहे. ‘टेलिग्राफ’ने दिलेल्या वृत्तानुसार, लिलाव प्रक्रियेनंतर मी खूप आनंदी आहे. ही खूप दमछाक करणारी प्रक्रिया होती. पण मला एका गोष्टीचं दु:ख आहे की आम्ही भज्जीला (हरभजन सिंग) संघात घेऊ शकलो नाही. यामुळे मी खूप निराश आहे, असे त्या म्हणाल्या.

दोन टप्प्यातील लिलाव प्रक्रिया पार पडल्यानंतर रविवारी नीता अंबानी म्हणाल्या, हा खेळाडू किंवा तो खेळाडू मला घेता आला नाही यामुळे मी निराश आहे, हे मी सांगू शकत नाही. पण मला एका गोष्टीचं खूप दु:ख आहे की, भज्जीला आमच्या संघात घेता आले नाही. मुंबई इंडियन्सने कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांना रिटेन केले पण हरभजनला त्यांनी खरेदी केले नाही. आकाश अंबानी याचाही याबाबत आई नीता यांच्यापेक्षा वेगळे विचार नाहीत.

दरम्यान, जेव्हा आयपीएलची सुरूवात झाली तेव्हापासून हरभजन सिंग हा मुंबई इंडियन्सकडून खेळत होता. शनिवारी झालेल्या पहिल्या टप्प्यातील लिलावात चेन्नई सुपर किंग्जने हरभजन सिंगला संघात घेतले. चेन्नईने हरभजन सिंगसाठी दोन कोटी रूपये मोजले. दहा वर्षांनंतर नवीन संघात संधी मिळाल्यामुळे हरभजन खूश आहे. त्याने तामिळमध्ये ट्विट करून आपला आनंदही व्यक्त केला.

Story img Loader