आजपासून आयपीएल म्हणजेच इंडियन प्रिमियर लीगच्या १५ व्या पर्वासाठीचा दोन दिवसीय लिलाव सुरु झाला आहे. या लिलावामध्ये १५ देशांचे ६०० खेळाडू आपलं नशीब आजमावणार आहे. या लिलावाच्या पहिल्या अडीच तासांमध्ये मोठ्या उलाढाली झाल्या असून अनेक महत्वाचे खेळाडू मोठ्या किंमतीला संघांनी विकत घेतलेत.
याच महत्वाच्या खेळाडूंपैकी दोन चर्चेतील सौदे ठरले ते शिखर धवन आणि श्रेयस अय्यरवर लावलेली बोली. हे दोन्ही खेळाडू मागील पर्वात दिल्लीकडून खेळले. यंदा मात्र श्रेयसला कोलकाता नाईट रायडर्सने तर शिखर धवनला पंजाबने विकत घेतलंय. पण या खरेदीवर दिल्लीच्या संघाने दिल्लीमधील सरोजीनी मार्केट बाहेर काढलेला एक फोटो शेअर करत मजेदार वक्तव्य केलंय.
नक्की पाहा >> IPL Auction 2022: लिलाव सुरु असताना अचानक ऑक्शनर कोसळला अन्…; धक्कादायक Video व्हायरल
दिल्ली कॅपिटल्सच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन पोस्ट करण्यात आलेल्या एका फोटोमध्ये दिल्लीमधील प्रसिद्ध बाजारपेठ असणाऱ्या सरोजिनी मार्केटसमोर एक मुलगा हातामध्ये पोस्टर घेऊन उभा असल्याचा दिसतोय. त्याच्या हातावरील पोस्टरवर, “तुमच्या पार्स साइजने आम्हाला जेलस (मत्सर वाटेल असं) वागणं बंद करा,” अशी ओळ लिहिली आहे. आमच्याकडे कमी पैसे असल्याने चांगल्या खेळाडूंना अदिक बोली लावत तुम्ही विकत घेतल्याचं यामधून दिल्लीला सुचवायचं असून कमी पैसे असल्याने तुमच्याकडी अधिकची रक्कम दाखवून आम्हाला चिडवू नका अशी मागणीच दिल्ली संघाने केलीय.
नक्की वाचा >> IPL Auction 2022: गब्बरची जब्बर कमाई… चौपट अधिक किंमत मिळत ठरला लिलाव झालेला पहिला खेळाडू
हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये दिल्लीच्या संघाने पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्सला टॅग केलंय. “गब्बर, अश्वीन, कगिसो रबाडा यासारख्या खेळाडूंना सोडणं फार कठीण आहे. विशेष म्हणजे जेव्हा हे खेळाडू उत्तरेकडील राज्यांच्या संघांमध्येच जाणार असताना हे अधिक कठीण आहे,” अशा कॅप्शनसहीत हा फोटो शेअर करण्यात आलाय.
पर्स कनेक्शन काय?
श्रेयस आणि पॅट कमिन्सला मोठ्या किंमतीला विकत घेतल्यानंतर कोलकात्याकडे २८ कोटी ५० लाखांचा निधी बाकी आहे तर पंजाबकडे ५४ कोटी ५० लाख बाकी आहेत. पंजाबने ८.२५ कोटींना धवनला आणि रबाडाला ९.२५ कोटींना विकत घेतलंय. या दोन्ही संघापेक्षा दिल्लीकडे कमी पैसे असल्याने त्यांच्यावर बोली लावताना एका मार्यादेपर्यंत बोली लावण्याचं बंधन असल्याचं ट्विटमधून संघाने अप्रत्यक्षपणे सांगितलंय. लिलावाआधी १० संघांनी ३३ खेळाडूंना रिटेन केलं आहे. प्रत्येक संघाला किमान १८ तर सर्वाधिक २५ खेळाडू संघात घेण्याची मूभा आहे. यंदा लिलावामध्ये प्रत्येक संघाला खेळाडूंवर ९० कोटी रुपये खर्च करण्याची मर्यादा घालून दिलीय. या लिलावामध्ये खेळाडूंवर ९०० कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे.
नक्की वाचा >> IPL Auction 2022: शाहरुखच्या KKR ला मिळाला मुंबईकर कॅप्टन?; तब्बल १२.२५ कोटींना संघात दिलं स्थान
धवन, रबाडा दोघेही दिल्लीच्या संघातून बाहेर…
मागील पर्वामध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळलेल्या धवनसाठी आधी दिल्ली कॅपिटल्सने बोली लावली. त्यानंतर पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनेही धवनसाठी बोली लावली. मात्र शेवटपर्यंत पंजाबची बोली सर्वोच्च राहिली. धवनला पंजाब किंग्जने ८ कोटी २५ लाखांना विकत घेतलं आहे. मागील पर्वामध्ये धवनला ५ कोटी २० लाख रुपयांना दिल्लीने आपल्या संघात घेतलं होतं. म्हणजेच यंदाच्या पर्वात धवनला ३ कोटींचा फायदा झालाय. आता धवन मयंक अग्रवालसोबत पंजाबसाठी सलामीवीर म्हणून फलंदाजी करताना दिसेल. तर पंजाब संघाने ९.२५ कोटी इतक्या किंमतीला दक्षिण आफ्रिकेच्या कगिसो रबाडाला संघात घेतले आहे.
अश्विनही बाहेर…
त्याचप्रमाणे अश्विनलाही संघात घेण्यासाठी आधी दिल्ली कॅपिटल्सने रस दाखवला. मात्र राजस्थान रॉयल्सने अधिक बोली लावत अश्विनला संघात घेतलं. राजस्थानने ५ कोटींमध्ये अश्विनला आपल्या संघात घेतले आहे.
अय्यरने आधीच दिल्लीचा संघ सोडला…
दुसरीकडे श्रेयस अय्यर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार राहिला आहे. त्याने २०२० मध्ये संघाला आयपीएलच्या अंतिम सामन्यामध्येही पोचवलं. मात्र २०२१ च्या पर्वात तो दुखापतीमुळे खेळू शकला नाही. त्यावेळी ऋषभ पंतकडे संघाची धुरा सोपवण्यात आली. मात्र नंतरही पंतकडेच संघाचं नेतृत्व राहिल्याने अय्यरने दिल्लीच्या संघाला सोडचिठ्ठी दिली.