इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये एक ऐतिहासिक विक्रम झाला आहे. आयपीएल २०२३ हंगामासाठी कोची येथे झालेल्या मिनी लिलावात इतिहासातील सर्वात मोठी बोली लागली आहे. इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू सॅम करनसाठी ही बोली लावण्यात आली आहे. या इंग्लिश खेळाडूला पंजाब किंग्जने (PBKS) १८.५० कोटी रुपयांची बोली लावून विकत घेतले आहे. २४ वर्षीय करन आता आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिसचा विक्रम मोडला आहे, ज्याला आयपीएल २०२१ च्या हंगामात राजस्थान रॉयल्सने १६.२५ कोटी रुपयांना विकत घेतले होते.
सॅम करनला दुखापतीमुळे लीगच्या शेवटच्या हंगामात मुकावे लागले होते, मात्र या हंगामात तो पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे. करनला विकत घेण्यासाठी त्याच्या दोन जुन्या संघ पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये दीर्घ लढाई झाली, ज्यामध्ये पंजाबने बाजी मारली. यासह करन हा या लीगमध्ये सर्वाधिक विकला जाणारा खेळाडूही ठरला आहे. चेन्नईमधून पंजाबमध्ये जाताच सॅम करनचे ट्विट व्हायरल झाले आहे.
बेन स्टोक्स पटलावर येताच रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांनी उडी मारली. ५ कोटींची बोली लावून आरसीबी आघाडीवर राहिले. परंतु राजस्थानने ६.७५ कोटींपर्यंत टक्कर दिली. त्यानंतर लखनौ सुपर जायंट्सची एन्ट्री झाली. काव्या मारनने इथेही खेळाडूची प्राईज वाढवली. १४ कोटींसह लखनऊ आघाडीवर होते, पण सॅम कुरनची संधी हुकलेल्या चेन्नईने एन्ट्री घेताना १५.२५ कोटींची बोली लावली. धोनी व स्टोक्स यापूर्वी रायझिंग पुणे सुपर जायंट्सकडून एकत्र खेळले होते. चेन्नईने १६.२५ कोटींत त्याला आपल्या ताफ्यता घेतले आहे. चेन्नईच्या ताफ्यात दाखल होताच बेन स्टोक्सने एक ट्विच केलं आहे. त्या ट्विटमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचा ओळखला जाणारा पिवळा रंगाचा फोटो त्यांनी ट्विटद्वारे शेअर केला आहे.
लिलावाच्या सुरुवातीलाच इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रुकसाठी चढाओढ पाहायला मिळाली. राजस्थान रॉयल्स आणि रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू यांनी सुरूवातीला हॅरी ब्रुकवर बोली लावली. राजस्थानने २.६ कोटींची बोली लावून आघाडी घेतली. ४ कोटी होताच आरसीबीने माघारी घेतली. ५.२५ कोटींपर्यंत बोली गेल्यावर ब्रुक राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात जाईल असे वाटत होते, परंतु सनरायझर्स हैदराबादने उडी मारली. काव्या मारनने प्राईज पॅडल उंचावत ब्रुकची किंमत ८ कोटींच्या वर नेली. अखेर हैदराबादने १३.२५ कोटींत त्याला ताफ्यात घेतले.