आयपीएल मिनी ऑक्शन ऑक्शन २०२३ च्या काही दिवस आधी ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू कॅमेरून ग्रीनबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. लिलावात त्याच्या खात्यात मोठी रक्कम जाईल, असा विश्वास होता. परंतु जेव्हा लिलावात त्याच्या नावावरची बोली संपली, तेव्हा देखील त्याला इतका आपण मौल्यवान असू शकतो, यावर विश्वास बसत नव्हता. ग्रीनला मुंबई इंडियन्सने लिलावात १७.५० कोटी रुपयांना विकत घेतले. तो आयपीएलच्या इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.
आयपीएलच्या इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरल्यानंतर, कॅमेरून ग्रीनने आपली प्रतिक्रिया दिली आहे.ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांशी बोलताना कॅमेरून म्हणाला, ”जे घडले ते पाहून मी स्वत:ला चिमटे काढत होतो. माझ्यासाठी आयपीएलचा लिलाव पाहणे ही एक वेगळीच भावना आहे. त्यावेळी मी किती नर्वस होतो यावर विश्वास बसत नाही. शेवटची बोली फायनल झाली, तेव्हा मी थरथर कापत होतो.”
ग्रीन पुढे म्हणाला, ”मी नेहमीच आयपीएलचा चाहता राहिलो आहे आणि त्याचा भाग होणे खूप छान आहे. मुंबई हे पॉवरहाऊस आहे आणि मी त्यांच्यात सामील होण्याची प्रतीक्षा करू शकत नाही.
२ कोटींपासून सुरू झाली होती बोली –
लिलावात कॅमेरून ग्रीनची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. त्याच्या नावावर पहिली बोली आरसीबीने लावली आणि त्यानंतर मुंबई त्यात सामील झाली. त्यानंतर ही रक्कम ७ कोटींवर पोहोचली. दिल्लीनेही ग्रीन विकत घेण्यासाठी बोली युद्धात उडी घेतली, तेव्हा ही बोली आणखीनच पुढे खेचली गेली. अखेर पर्समधून १७.५० कोटी रुपये खर्च करुन कॅमेरूनला मुंबईने आपल्या ताफ्यात जोडले.
आकाश अंबानीदेखील झाला खूश –
आयपीएलच्या सर्वात यशस्वी संघांमध्ये मुंबई इंडियन्सचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र, स्पर्धेतील त्याचा शेवटचा हंगाम चांगला गेला नाही. किरॉन पोलार्डचा बदली खेळाडू म्हणून संघाला सामने जिंकून देऊ शकेल, अशा खेळाडूची गरज होती. मुंबईचा हा शोध कॅमेरून ग्रीन येथे संपुष्टात येत होता. ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडूवरील बोली जिंकल्यानंतर संघ मालक आकाश अंबानीची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. आकाश, जो सहसा खूप शांत असतो, त्याने बोली फायनल होताच आनंदाने उडी मारली.
सामने फिरवण्याची आहे क्षमता –
टी-२० विश्वचषकापूर्वी भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियन संघात कॅमेरून ग्रीनचाही समावेश होता. मोहालीत खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० मध्ये त्याने अवघ्या ३० चेंडूत ६१ धावा करत सामना उलथवून टाकला. हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-२०मध्ये कॅमेरूनने केवळ २१ चेंडूत ७ चौकार आणि 3 षटकारांसह ५२ धावा केल्या होत्या. अशा प्रकारे त्याच्याकडे संघाला एक हाती सामना जिंकून देण्याची क्षमता आहे.