आयपीएल २०२३ साठी, २३ डिसेंबर (शुक्रवार) रोजी कोची येथे खेळाडूंचा मिनी लिलाव होत आहे. सर्व १० फ्रँचायझी संघांसोबतच चाहते आणि क्रिकेटपटूही आयपीएलच्या या मिनी लिलावाची आतुरतेने वाट पाहत होते. या लिलाव प्रक्रियेला दुपारी २:३० वाजेपासून सुरुवात झाली आहे. कॅरेबियन स्फोटक अष्टपैलू निकोलस पूरनला देखील या लिलावात मोठी बोली लागली आहे.
निकोलस पूरनला लखनौ सुपर जायंट्स संघाने १६ कोटी रुपयांना आपल्या ताफ्यात सामील केले आहे, जे खूप आश्चर्यकारक आहे. वास्तविक पूरन दरवर्षी प्रतिष्ठित लीगमध्ये त्याच्या नावानुसार कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळेच एवढ्या मोठ्या रकमेत पूरन विकला गेल्याने सर्वांना आश्चर्य वाटत आहे.
निकोलस पूरनची आयपीएल कारकीर्द –
जर आपण निकोलस पूरनच्या आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकली, तर त्याने येथे ४७ सामने खेळले आहेत. दरम्यान, त्याच्या बॅटमधून ४४ डावांत २६.०६ च्या सरासरीने केवळ ९१२ धावा झाल्या आहेत. आयपीएलमध्ये त्याचा स्ट्राईक रेट नक्कीच चांगला आहे. त्याने १५१.२४ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. पूरनने आयपीएलमध्ये चार अर्धशतके नोंदवली आहेत.
निकोलस पूरनची टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द –
त्याच्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे, तर त्याने येथेही विशेष कामगिरी केली नाही. वेस्ट इंडिजकडून ७२ टी-२० सामने खेळताना त्याने ६४ डावांमध्ये २५.४८ च्या सरासरीने १४२७ धावा केल्या आहेत. दरम्यान, त्याच्या बॅटमधून नऊ अर्धशतकी खेळी केल्या आहेत. टी-२० मध्ये त्याचा स्ट्राइक रेट १२९.०२ आहे.
हेही वाचा – IPL Auction 2023: केन विल्यमसनला तब्बल इतक्या कोटींचा बसला फटका, आता ‘या’ जर्सीत दिसणार
सनरायझर्स हैदराबादने केले होते रिलीज –
निकोलस पूरन गेल्या वर्षी सनरायझर्स हैदराबाद संघात सामील झाला होता. यादरम्यान फ्रँचायझीने त्याच्यावर १०.७५ कोटी रुपये खर्च केले होते. पण संघासाठी त्याने प्रभावी कामगिरी न केल्यामुळे फ्रँचायझीने त्याला यावर्षी सोडून दिले. पूरन हा फलंदाजीसोबतच व्यावसायिक यष्टिरक्षक आहे.