आयपीएल २०२३ साठी मिनी लिलाव शुक्रवारी (२३ डिसेंबर) कोची येथे होणार आहे. यावेळचा लिलाव छोटा असेल, मात्र प्रत्येक वर्षीच्या लिलावाप्रमाणेच यंदाही चाहत्यांमध्ये आणि खेळाडूंमध्ये तसाच उत्साह आहे. यावेळी ९९१ क्रिकेटपटूंनी लिलावासाठी नोंदणी केली होती आणि अखेरीस ४०५ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि मिस्टर आयपीएलने एक मोठी भविष्यवाणी केली आहे. सुरेश रैनानेही तीन नावे सुचवली आहेत, ज्यांच्यावर मोठी बोली लागू शकते.
यावेळी लिलावापूर्वी अनेक दिग्गजांनी आपले संघ सोडले आहेत. त्यामुळे त्यांची जागा भरण्यासाठी फ्रँचायझींमध्ये चुरशीची लढत होऊ शकते. उदाहरणार्थ केन विल्यमसनच्या जागी हैदराबादला नवीन कर्णधाराची गरज आहे, तर ड्वेन ब्राव्हो आणि किरॉन पोलार्डच्या संघांनाही ही उणीव भासणार आहे. मोठ्या नावांव्यतिरिक्त, आयपीएलचा दिग्गज सुरेश रैनानेही तीन अनकॅप्ड नावे सुचवली आहेत, ज्यांना लिलावात मोठी बोली लागू शकते.
चेन्नई सुपर किंग्जचा माजी फलंदाज सुरेश रैनाने आयपीएलच्या मिनी लिलावापूर्वी भाकीत केले आहे की, जम्मू-काश्मीरचा डावखुरा वेगवान गोलंदाज मुजतबा युसूफ आणि अफगाणिस्तानचा १५ वर्षीय फिरकी गोलंदाज अल्लाह मोहम्मद हे काही निवडक खेळाडू असतील. ज्यांना आयपीएल २०२३ च्या लिलावात मोठी रक्कम मिळू शकते. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सर्वाधिक षटकार (२२) मारणाऱ्या सौराष्ट्रच्या समर्थ व्यासचे नावही रैनाने जोडले. विजय हजारे ट्रॉफीमध्येही त्याने द्विशतक झळकावले होते.
जिओ सिनेमाच्या आयपीएल प्लेयर ऑक्शन एक्सपर्ट डिस्कशनमध्ये सुरेश रैना म्हणाला, “मी मुजतबासोबत सय्यद मुश्ताक अलीमध्ये खेळलो आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज, त्याच्याकडे चांगली अॅक्शन आणि स्विंग कंट्रोल आहे. त्यानंतर समर्थ व्यार आहे, ज्याने सौराष्ट्रासाठी १५० पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. तसेच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत टॉप-५ मध्ये आहे.”
रैना पुढे म्हणाला, “पण नजर अल्लाह मोहम्मदवर असेल. १५ वर्षीय ६ फूट २ इंच ऑफस्पिनरचे हृदय मोठे आहे. अफगाणिस्तानातून अनेक प्रतिभावंत येत आहेत.”
१५ वर्षीय अल्लाह मोहम्मद गजफर हा अफगाणिस्तानचा उजव्या हाताचा ऑफ-स्पिनर आहे. तो आगामी मिनी-लिलावात पकडण्यासाठी दिसून येईल. आयपीएल लिलावातील सर्वात तरुण खेळाडू, गझनफरने यापूर्वी बिग बॅश लीग लिलावासाठी नोंदणी केली होती. परंतु त्याला कोणी खरेदीदार सापडला नाही.