Mohammad Kaif given advice to RCB about Rohit Sharma : आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलने शनिवारी रात्री आयपीएल २०२५ च्या मेगा ऑक्शनसाठी आठ नवीन नियमांची घोषणा केली आहे. यामध्ये संघांना जास्तीत जास्त सहा खेळाडू रिटेन करण्याची किंवा राईट टू मॅच (आरटीएम) कार्ड पर्याय वापरून संघात ठेवण्याची परवानगी असेल. आता मेगा लिलावापूर्वी १० संघांच्या मनात कोणते खेळाडू कायम ठेवायचे हे स्पष्ट झाले असेल. दरम्यान, माजी भारतीय दिग्गजाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला रोहित शर्माला कर्णधार म्हणून घेण्याचा सल्ला दिला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने आयपीएलच्या १७ वर्षांच्या इतिहासात एकदाही ट्रॉफी जिंकली नाही. अशात माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफने आरसीबीला एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. मोहम्मद कैफ म्हणाला, संधी मिळाल्यास रोहित शर्माचा संघात समावेश करा. रोहितने आपल्या नेतृत्वाखाली मुंबईला पाच आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली आहेत. अशा परिस्थितीत रोहित आरसीबीमध्ये सामील झाल्यास संघाला पहिले विजेतेपद मिळू शकते, अशी अटकळ बांधली जात आहे.

मोहम्मद कैफचा आरसीबीला महत्त्वाचा सल्ला –

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये कैफने रोहित शर्माबद्दल बोलताना सांगितले की, “खेळाडू हा १९-२० असतो. हा माणूस १८ वाल्याला २० करतो. त्याला खांद्यावर हात ठेवून चांगली कामगिरी कशी करुन घ्यायची माहित आहे. त्याला डावपेचांच्या चाली चांगल्या प्रकारे माहीत आहेत. कोणत्या खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमध्ये कुठे फिट बसवायचे, हे त्याला उत्तम प्रकारे माहीत आहे. त्यामुळे मला वाटतं की, आरसीबीला संधी मिळाली, तर त्यांनी रोहित शर्मा कर्णधार म्हणून संघात सामील करुन घ्यायला हवे.”

हेही वाचा – SA vs IRE 2nd T20 : आयर्लंडचा ऐतिहासिक विजय! प्रथमच बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा १० धावांनी उडवला धुव्वा

मुंबई इंडियन्स रोहित शर्माला रिलीज करणार का?

आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या जागी संघाचे कर्णधारपद हार्दिक पंड्याकडे सोपवले होते. हार्दिकला आधी मुंबईने गुजरात टायटन्सला घेतले आणि नंतर कर्णधार बनवले. तेव्हापासून, आयपीएल २०२५ च्या आधी होणाऱ्या मोठ्या लिलावापूर्वी रोहित शर्माला रिलीज केले जाऊ शकते, अशा चर्चा सुरु आहेत. मात्र, मुंबई इंडियन्स रोहित शर्माला रिलीज करणार की नाही हे अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही. कारण सर्व संघांना रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी ३१ ऑक्टोबरला बीसीसीआयकडे सादर करायची आहे.