IPL Auction 2025 Royal Challengers Bengaluru: बीसीसीआयने आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावापूर्वी रिटेंशनचे नियम जाहीर केले आहेत. सर्व फ्रँचायझींना ३१ ऑक्टोबरपर्यंत रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी सादर करण्यास सांगितले आहे. बीसीसीआयने आयपीएल २०२५ साठी अनेक नवीन नियम केले आहेत आणि यावेळी मेगा लिलाव खूप मनोरंजक असणार आहे. पुढील हंगामातील मेगा लिलावापूर्वी, भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज आरपी सिंग याने RCB ला एक सल्ला दिला आहे की त्यांनी विराट कोहलीला कायम ठेवून IPL 2025 च्या लिलावापूर्वी उर्वरित संघातील खेळाडूंना रिलीज करण्याा विचार करावा.

हेही वाचा – WTC Points Table: श्रीलंकेमुळे ऑस्ट्रेलियाचा WTC अंतिम फेरीचा मार्ग खडतर; कसोटी मालिकेत न्यूझीलंड संघावर मिळवला एकतर्फी विजय

आयपीएलच्या नवीन रिटेंशन नियमांनुसार, प्रत्येक संघाला ६ खेळाडूंना कायम ठेवण्याची किंवा RTM वापरून खेळाडूंना परत संघात सामील करण्याची संधी देण्यात आली आहे. कोहली आयपीएल २०२४ मध्ये आरसीबीसाठी एक महत्त्वाचा खेळाडू असल्याचे त्याने सिद्ध केले आहे आणि संघाला प्लेऑफमध्ये नेण्यात त्याने मोठी भूमिका बजावली. इतकेच नव्हे तर आयपीएल २०२४ मध्ये कोहलीने ऑरेंज कॅप जिंकली आणि १५ सामन्यात ७४१ धावा केल्या. कलर्स सिनेप्लेक्सशी बोलताना आरपी सिंह म्हणाला की कोहलीने संघात कायम राहाने, तर मोहम्मद सिराज आणि रजत पाटीदार सारख्या इतर खेळाडूंना आरटीएम कार्ड वापरून लिलावात परत आणता येईल.

हेही वाचा – IPL Auction 2025: विदेशी खेळाडूंवर वचक बसवण्यासाठी BCCI ची युक्ती, आयपीएलमध्ये ‘हा’ नियम मोडल्यास दोन वर्षांची बंदी

आरपी सिंह म्हणाला, “आरसीबी फक्त विराट कोहलीली रिटेन करेल आणि संघातील इतर सर्व खेळाडूंना रिलीज केलं पाहिजे आणि राईट टू मॅच कार्डचा पर्याय वापरला पाहिजे. यामध्ये आरसीबीला कोणतीही अडचण नसली पाहिजे. जर आपण रजत पाटीदारचे उदाहरण घेतले तर आपण त्याला लिलावात ११ कोटी रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल. माझ्यामते, रजत पाटीदार कमी किमतीत करारबद्ध होऊ शकतो आणि मग तुम्ही त्याला लिलावात परत घेऊ शकता. समजा जरी त्याची किंमत ११ कोटींच्या जवळपास गेली तरी तुमच्याकडे RTM आहे जे तुम्ही तिथे वापरू शकता.”

आरपी सिंहने सांगितले की, “सिराजची कामगिरी पाहता सिराजला ११ कोटींच्या जवळपास बोली लागू शकते का हे पाहावे लागेल. मला वाटत नाही की सिराज १४ कोटी रुपयांच्या जवळपास पोहोचू शकेल. इथेही जर खूप मोठ्या रकमेपर्यंत तो पोहोचला तर RTM वापरण्याचा पर्याय असेल. आरपी पुढे म्हणाला की, आरसीबीला नव्या मानसिकतेने पुढे जाण्याची गरज आहे. त्यांना विराटची गरज आहे कारण त्याने या संघासाठी खूप काही केलं आहे आणि तो सर्वात महत्त्वाचा खेळाडू आहे. आरसीबीने कोहलीला लक्षात घेता संघ बांधणी करण्याचा विचार करायला हवा. माझ्या मते आरसीबीमध्ये कोहलीशिवाय दुसरा कोणताही खेळाडू १८ किंवा १४ कोटी रुपयांची बोली लागेल असा नाहीय.”

भारतीय खेळाडूंशिवाय आरसीबीच्या ताफ्यात फॅफ डू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरून ग्रीन आणि विल जॅक असे स्टार विदेशी खेळाडू आहेत. यापैकी आरसीबी कोणत्या विदेशी खेळाडूला रिटेन करेल यावर सर्वांच्या नजरा असतील.