असंख्य वाद आणि न्यायालयीन लढाईत सापडलेल्या इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेच्या आठव्या हंगामासाठी सोमवारी लिलाव होणार आहे. स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजी यासंदर्भात चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स संघांचे भवितव्य अधांतरी असतानाही लिलाव प्रक्रिया होणार आहे.
गेल्या वर्षी सर्वाधिक बोलीसह सर्वाधिक रक्कम खर्च करून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने युवराज सिंगला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. मात्र लौकिकाला साजेशी कामगिरी करता न आल्याने चॅलेंजर्स व्यवस्थापनाने युवराजला डच्चू देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे लिलावात पुन्हा एकदा युवराज फ्रँचायजींसाठी आकर्षण असणार आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाला गेल्या वर्षी गुणतालिकेत तळाच्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. विजयपथावर परतण्यासाठी त्यांनी संघाची पुनर्रचना केली आहे. केव्हिन पीटरसन, मुरली विजय, दिनेश कार्तिक हे लिलावात उपलब्ध आहेत. सनरायझर्स हैदराबादने इरफान पठाण, आरोन फिंच, अमित मिश्रासह डॅरेन सॅमीला वगळल्याने लिलावात या खेळाडूंना खरेदी करण्यासाठी चुरस असणार आहे.
मुंबई इंडियन्स व्यवस्थापनाने वगळलेल्या माइक हसी आणि प्रवीण कुमार यांना खरेदी करण्यासाठी फ्रँचाइजी उत्सुक आहेत. कसोटी आणि एकदिवसीय पुरताच मर्यादित हशीम अमला यालाही लिलावात समाविष्ट करण्यात आले आहे. संयमी खेळासाठी प्रसिद्ध अमलाला ताफ्यात दाखल करून घेण्यासाठी फ्रँचायजी आतुर आहेत.  इंग्लंडमधील व्यावसायिक लिलावतज्ज्ञ रिचर्ड मॅक्ले हे या लिलावाचे सूत्रसंचालन करणार आहेत. २००८ पासून तेच दरवर्षी या स्पर्धेसाठी लिलावाचे सूत्रसंचालन करीत आहेत. यंदा या लिलावात ७८ भारतीय खेळाडूंसह १२२ खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. संघातील एकूण खेळाडूंच्या मानधनाबाबत प्रत्येक फ्रँचाईजीसाठी ६३ कोटी रुपयांची मर्यादा ठेवण्यात आली आहे. मानधनात गतवर्षीपेक्षा पाच टक्के वाढ करण्यात आली आहे. ८ एप्रिलपासून आयपीएलच्या आठव्या हंगामाला सुरुवात होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा