भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) या दोन संघटनांच्या अनुक्रमे अध्यक्ष व कार्याध्यक्षपदी निवड झाल्याने एन. श्रीनिवासन यांची मान अभिमानाने ताठ झाली होती, पण मयप्पन याच्या कुकर्मामुळे त्यांचा पायही खोलात गेला आहे. श्रीनिवासन यांच्या आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज या संघातील मयप्पनच्या सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. यासाठी सर्वोच्च न्यायालयाने ही त्रिसदस्यीय समिती नेमली होती. समितीच्या अहवालातील निष्कर्षांनुसार मयप्पन हा चेन्नईच्या संघाचा एक अविभाज्य भाग होताच, पण त्याचा सट्टेबाजीतही सहभाग होता आणि संघातील गोपनीय माहिती सट्टेबाजांना पुरवण्यातही त्याची मोलाची भूमिका होती. पंजाब आणि हरयाणाचे माजी मुख्य न्यायाधीश मुकुल मुदगल यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एन. नागेश्वर राव आणि आसाम क्रिकेट संघटनेचे नीलय दत्त यांचा समावेश होता.
सातव्या आयपीएल स्पर्धेतील खेळाडूंचा लिलाव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेला असताना समितीने हा निष्कर्ष दिल्याने चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या यंदाच्या मोसमातील सहभागाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, राजस्थान रॉयल्स संघाचे मालक राज कुंद्रा आणि त्यांची अभिनेत्री पत्नी शिल्पा शेट्टी यांच्या सट्टेबाजीतील सहभागाबाबतच्या आरोपांची आणखीन चौकशी करण्याची गरज असल्याचे समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे तूर्त तरी या दोघांना दिलासा मिळाला आहे. शिवाय बीसीआयचे अध्यक्ष म्हणून धुरा सांभाळताना श्रीनिवासन हे चेन्नई सुपर किंग्जचेही प्रमुख आहेत. त्यामुळे यातील हितसंबंधाबाबत उपस्थित केलेला मुद्दा गंभीर असला तरी तो आपल्यासमोर नाही. तो मुद्दा सर्वोच्च न्यायालयच विचारात घेईल. तरीही बऱ्याच समभागधारकांनी हा मुद्दा उपस्थित केल्याने तो न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणे आवश्यक वाटल्याचे समितीने अहवालात स्पष्ट केले. याशिवाय चौकशीत संशयित म्हणून ज्यांची नावे पुढे आली आहेत. त्यांची नावे समितीने मोहोरबंद पाकिटात न्यायालयासमोर सादर केली.
पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने मुख्य न्यायमूर्ती मुकुल मुदगल यांच्या अध्यक्षतेखाली सर्वोच्च न्यायालयाने मय्यपन आणि कुंद्रा यांच्याविरुद्धच्या आरोपांच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती नियुक्त केली होती. सोमवारी या समितीने आपला अहवाल सादर केला. श्रीनिवासन यांनी मयप्पनचा चेन्नईच्या संघाशी काहीही संबंध नसल्याचे जाहीर केले होते. मयप्पन हा फक्त क्रिकेटचा चाहता असल्याने संघाबरोबर असतो, असा दावाही त्यांनी केला होता. परंतु समितीने श्रीनिवासन यांचा हा दावा स्पष्टपणे फेटाळून लावला आहे. मयप्पनची चेन्नईच्या संघात महत्त्वाची भूमिका असल्याचे आणि त्याने आयपीएल सामन्यांदरम्यान सट्टेबाजी केल्याचे तसेच त्यासाठी संघातील गोपनीय माहिती बाहेरच्या व्यक्तींना पुरविल्याचे सबळ पुरावे पुढे आले आहेत. त्यामुळे त्याच्याविरुद्धचे सट्टेबाजीचे आरोपही सिद्ध झाल्याचा निष्कर्ष समितीने अहवालात नोंदवला आहे. मयप्पनने चेन्नई संघाच्या बाजूने तसेच विरोधातही सट्टेबाजी केल्याचे समितीने म्हटले आहे. तसेच निकालनिश्चितीबाबतच्या आरोपांची आणखीन चौकशी करण्याची गरज असल्याचे समितीने म्हटले आहे.
आयपीएलच्या सातव्या हंगामाचा लिलाव दोन दिवसांनंतर होणार असल्याने चेन्नई संघाचे काय होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. फ्रँचायजींच्या करारातील तरतुदींनुसार कोणतीही फ्रँचायजी, फ्रँचायजी समूह किंवा फ्रँचायजीचा मालक यांच्यामुळे जर आयपीएल, बीसीसीआय आणि क्रिकेटसारख्या खेळाच्या प्रतिष्ठेवर विपरीत परिणाम होत असेल तर त्यांचा करार रद्द केला जातो. या पाश्र्वभूमीवर बीसीसीआय चेन्नई संघाच्या भवितव्याबाबत काय निर्णय घेईल हेही लवकरच स्पष्ट होईल.
श्रीनिवासन यांचा पाय खोलात
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) या दोन संघटनांच्या अनुक्रमे अध्यक्ष व कार्याध्यक्षपदी निवड झाल्याने एन. श्रीनिवासन यांची मान अभिमानाने ताठ झाली होती,
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 11-02-2014 at 03:57 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl betting panel indicts bcci chiefs son in law