IPL 2019 : Playoffs च्या पहिल्या सामन्यात (Qualifier 1) मुंबईने चेन्नईला ६ गडी राखून सहज पराभूत केले. १३२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या सूर्यकुमार यादवने नाबाद अर्धशतकी खेळी केली. या विजयासह मुंबईने पाचव्यांदा स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. चेन्नईने शुक्रवारी दिल्लीला पराभूत करून अंतिम सामन्यात प्रवेश तर मिळवला, पण IPL इतिहासातील आकडेवारी पाहता चेन्नईचे शेर मुंबई इंडियन्सपुढे नेहमीच ढेर होताना दिसून आले आहेत.

IPL Final चा इतिहास मुंबईच्या बाजूने

IPL मध्ये मुंबई आणि चेन्नई हे २ संघ स्पर्धेच्या अंतिम फेरीत ३ वेळा आमने सामने आले आहेत. २०१० साली जेव्हा अंतिम सामना रंगला, त्यावेळी चेन्नईने मुंबईला २२ धावांनी पराभूत केले होते. त्यानंतर २०१३ साली मुंबई इंडियन्सचा संघ दमदार पुनरागमन करून चेन्नईपुढे अंतिम सामन्यात उभा ठाकला होता. त्या सामन्यात चेन्नईला मुंबईकडून २३ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. तर २०१५ साली पुन्हा एकदा मुंबई चेन्नई अंतिम सामना रंगला. या सामन्यात मुंबईने चेन्नईला ४१ धावांनी मात दिली होती.

IPL 2019 मध्ये चेन्नईविरुद्ध मुंबई ३-० ने आघाडीवर

या स्पर्धेत मुंबई आणि चेन्नई 3 वेळा आमने सामने आले. या तिनही सामन्यात मुंबईने चेन्नईवर विजय मिळवला. ३ एप्रिलला हे दोन संघ पहिल्यांदा या स्पर्धेत आमने सामने आले होते. त्यावेळी जेसन बेहरनडॉर्फ, लसिथ मलिंगा आणि हार्दिक पांड्याने केलेल्या माऱ्याच्या जोरावर मुंबईने घरच्या मैदानावर विजयाची नोंद केली होती. इतकेच नव्हे तर चेन्नई सुपरकिंग्जवर ३७ धावांनी मात करत मुंबईने IPL 2019 मधील चेन्नईची विजयाची मालिका खंडीत केली होती.

दुसऱ्या वेळी हे दोन संघ स्पर्धेत आमने सामने आले असताना मुंबईने चेन्नईला घरच्या मैदानावर पराभूत केले. यंदाच्या हंगामात चेन्नईला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत करणारा मुंबई पहिलाच संघ ठरला. रोहित शर्माने कर्णधारपदाला साजेशी अर्धशतकी (६७) खेळी करत मुंबईला १५५ धावांपर्यंत पोहोचवले आणि चेन्नईपुढे १५६ धावांचे आव्हान ठेवले. पण या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला केवळ १०९ धावाच करता आल्या.

तिसऱ्यांदा हे दोन संघ Playoffs च्या पहिल्या सामन्यात आमनेसामने आले होते. यावेळी देखील मुंबईने चेन्नईला सहज पराभूत केले. १३२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या सूर्यकुमार यादवने नाबाद अर्धशतकी खेळी केली. या सामन्यात चेन्नईकडून चाहत्यांना खूप अपेक्षा होत्या. पण चेन्नईच्या संघाला खेळपट्टीचा अंदाजच घेता आला नाही, असे धोनीने या पराभवाबाबत बोलताना मेनी केले.

IPL स्पर्धेत बहुतांश वेळा मुंबई वरचढ

मुंबई आणि चेन्नई यांच्यात झालेल्या एकूण २७ सामन्यांमध्येही मुंबईच पुढे आहे. या सामन्यांपैकी मुंबईने १६ सामने जिंकले आहेत, तर ११ सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला. याशिवाय चेन्नईच्या मैदानावर झालेल्या मुंबई चेन्नई सामन्यातही मुंबईने ५-२ अशी आघाडी राखली आहे.

मुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघांनी या हंगामाची सुरुवात चांगली केली होती. पण मधल्या सामन्यात काही पराभव पत्करावे लागल्याने दोनही संघ थोडे अडखळले. पण अखेर चेन्नईने सर्वप्रथम प्ले ऑफ्स फेरी गाठली. पंजाबविरुद्ध शेवटचा साखळी सामना पराभूत होऊनही चेन्नईचा संघ गुणतालिकेत अव्वल होता. पण मुंबईने कोलकाताला धूळ चारत गुणतालिकेत अग्रक्रम पटकावला.

आता अंतिम सामन्यात मुंबई इतिहासाची पुनरावृत्ती करणार की चेन्नई नव्या इतिहासाच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.