मुंबई आणि चेन्नई यांच्यात आज (रविवारी) IPL स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. Playoffs च्या पहिल्या सामन्यात (Qualifier 1) मुंबईने चेन्नईला ६ गडी राखून सहज पराभूत केले. १३२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या सूर्यकुमार यादवने नाबाद अर्धशतकी खेळी केली. या विजयासह मुंबईने पाचव्यांदा स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. त्यानंतर चेन्नईने शुक्रवारी दिल्लीला पराभूत करून अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. आता अंतिम सामन्यात पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा हे दोन कर्णधार आमने सामने येणार आहेत.

या स्पर्धेत मुंबई आणि चेन्नई ३ वेळा आमने सामने आले. या तीनही सामन्यात मुंबईने चेन्नईवर विजय मिळवला. त्यामुळे आजच्या सामन्यात मुंबईचे पारडे जड असल्याचे बोलले जात आहे. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा हा सध्या फारसा चांगल्या लयीत नाही. पण तरीदेखील त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत. याशिवाय मुंबईचा आणखी एक खेळाडू आहे, त्याच्याकडूनही साऱ्यांना खूप अपेक्षा आहेत. तो म्हणजे विंडीजचा स्फोटक फलंदाज कायरन पोलार्ड. हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा या खेळाडूंकडून चाहत्यांना चांगल्या खेळाची अपेक्षा आहेच, पण पोलार्डने आजच्या दिवशी विशेष कामगिरी करून दाखवावी अशी अपेक्षा केवळ चाहतेच नव्हे, तर क्रिकेटच्या देवानेही व्यक्त केली आहे.

कायरन पोलार्ड याचा आज वाढदिवस. त्या निमित्ताने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने पोलार्डला खास संदेश दिला आहे. सचिनने पोलार्डला सर्वप्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण या बरोबरच त्याने पोलार्डला हा दिवस आणखी खास बनवण्याचा सल्ला दिला आहे. तसेच हा दिवस कसा खास बनवायचा, हे तुला समजलेच असेल असेही सचिनने ट्विटमध्ये म्हंटले आहे.

दरम्यान, रोहित शर्माच्या अनुपस्थितीत एकमेव सामन्यात पोलार्डला मुंबईचे कर्णधारपद भूषवण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी पोलार्डने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत मुंबईला सामना जिंकवून दिला होता.

Story img Loader