काल १५ ऑक्टोबरला आयपीएल २०२१ स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. यात महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाइट रायडर्सचा पराभव करत जेतेपद जिंकले. या सामन्यासाठी बीसीसीआय़ अध्यक्ष सौरव गांगुलीसर अनेक दिग्गज व्यक्तींनी हजेरी नोंदवली होती. पण माध्यमांच्या माहितीनुसार, एक आश्चर्यचकित करणारी बातमी समोर आली आहे. गांगुलीने या सामन्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांनाही आमंत्रण दिले होते.

पाकिस्तान क्रिकेटच्या वृत्तानुसार, एशियन क्रिकेट काऊंसिलच्या बैठकीत गांगुलींने राजा यांना अंतिम सामना पाहण्यासाठी आमंत्रित केले. मात्र, त्यांची येण्याची शक्यता नव्हती. बैठकीत दोघांनीही एशियन क्रिकेटच्या मजबूतीबाबत चर्चा केली. भारत आणि पाकिस्तान संघात सन २०१२ नंतर द्विपक्षीय मालिका झालेली नाही. दोन्हीही संघ मोठ्या स्पर्धांमध्ये आमनेसामने येतात. पाकिस्तानच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यास बंदी आहे.

हेही वाचा – धक्कादायक..! भारताच्या माजी कर्णधाराचे २९व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन

आयपीएल २०२१च्या अंतिम सामन्यावेळी बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघ युएई येथे पोहोचला आहे. तो पहिल्यांदाच टी-२० विश्वचषकात संघाचे नेतृत्व करत आहे.आगामी टी-२० विश्वचषकात जगभरातील १६ संघ उतरणार आहेत. यातील सामने १७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. या स्पर्धेचा अंतिम सामना १४ नोव्हेंबर रोजी दुबईत खेळला जाईल. स्पर्धेच्या ७ व्या पर्वाचे सामने ओमान आणि युएईमध्ये खेळले जातील.

सुरुवातीला या स्पर्धेचे आयोजन भारतात होणार होते. मात्र, करोनामुळे या स्पर्धेचे आयोजन युएईत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. बीसीसीआयकडे या स्पर्धेचे यजमानपद आहे. स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामना २४ ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे.

Story img Loader