एलिमिनेटरचा सामनाही वानखेडेवर नाही
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए)यांच्यामधील राजकारणाचा फटका दर्दी मुंबईकरांना बसणार आहे. यंदाच्या आयपीएलचा अंतिम सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमऐवजी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. त्याचबरोबर २८ मे रोजी वानखेडेवर होणारा ‘एलिमिनेटर’चा सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्याचा निर्णय या वेळी बीसीसीआयने घेतला आहे. पण ३० मे रोजी होणारा ‘क्वालिफायर-२’ हा सामना वानखेडेवर खेळवण्यात येणार आहे. शनिवारी झालेल्या आयपीएल प्रशासकीय समितीच्या बैठकीमध्ये हे निर्णय घेण्यात आले असून, याबाबत कोणतेही कारण त्यांनी दिलेले नाही. आयपीएलच्या नियमांनुसार गतविजेत्या संघाला ‘क्वालिफायर-२’ आणि अंतिम फेरीचे यजमानपद मिळते. त्यानुसार शेवटचे दोन सामने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार होते. पण आयपीएल प्रशासकीय समितीने तडकाफडकी निर्णय घेत अंतिम सामना बंगळुरूला हलवल्यामुळे मुंबईकरांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
त्याचबरोबर मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यामध्ये ईडन गार्डन्सवर होणारा सामना अखेर कटकच्या बाराबत्ती स्टेडियमवर खेळवण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण आयपीएल प्रशासकीय समितीने दिले आहे. त्याचबरोबर तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनने एम. ए. चिदंबरम स्टेडियम उपलब्ध नसल्याचे सांगितले असून १८ आणि २२ मे रोजी होणारे सामने रांचीमध्ये खेळवण्यात येतील.
मुंबई आणि बंगळुरू यांच्यातील सामन्यामध्ये किरॉन पोलार्ड आणि मिचेल स्टार्क यांच्यामधील अशोभनीय कृत्याबाबत आयपीएलच्या प्रशासकीय समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.

निर्णयाबाबत एमसीएची बीसीसीआयला विचारणा
आयपीएलचा अंतिम सामना वानखेडे स्टेडियमवरून बंगळुरूला हलवण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयावर एमसीएने सध्या तरी कोणतेही भाष्य करण्याचे टाळले आहे. मात्र, हा सामना का अन्यत्र खेळवण्यात येत आहे, याची विचारणा करणारे पत्र एमसीएने बीसीसीआयला पाठवले आहे. ‘‘रात्री दहानंतर ध्वनीसंदर्भात असलेली बंधने असो किंवा अन्य कोणतीही कारणे असोत, आम्हाला ती कळायला हवीत, त्यानंतरच आम्ही आमची बाजू मांडू,’’ असे एमसीएचे उपाध्यक्ष रवी सावंत यांनी सांगितले.

‘प्ले-ऑफ’चे वेळापत्रक
तारीख    सामना    स्थळ    वेळ
२७ मे    क्वालिफायर-१     ईडन गार्डन्स,कोलकाता      रात्री ८ वा.
२८ मे    एलिमिनेटर    ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई         रात्री ८ वा.
३० मे    क्वालिफायर-२    वानखेडे स्टेडियम, मुंबई    रात्री ८ वा.
१ जून    अंतिम फेरी    चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू  रात्री ८ वा.

Story img Loader