इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० स्पध्रेचा अंतिम सामना मिळवण्यासाठी १४ अटींची पूर्तता करा, या मुंबई क्रिकेट असोसिएशनला (एमसीए) दिलेल्या वचनाला आयपीएल प्रशासकीय समिती जागली नाही. एमसीएच्या यजमानपदाच्या मागणीला केराची टोपली दाखवत आधी जाहीर केल्याप्रमाणे आयपीएलचा अंतिम सामना १ जूनला बंगळुरूलाच होणार आहे, असा निर्णय आयपीएल प्रशासकीय समितीने घेतला आहे. त्यामुळे मुंबईकरांची घोर निराशा झाली आहे.
‘‘आयपीएल प्रशासकीय समितीच्या शनिवारी रात्री झालेल्या चर्चेत या विषयावर विचारविमर्श करण्यात आला. याचप्रमाणे अंतिम सामना बंगळुरूला खेळवण्याच्या आधीच्या निर्णयावरच कायम राहण्याबाबत या बैठकीत एकमत झाले,’’ अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव संजय पटेल यांनी बडोद्याहून दिली. ‘‘तयारीसंदर्भात अनेक गोष्टी स्थगित होत्या, हे याचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे,’’ असे त्यांनी पुढे सांगितले.
बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीएल प्रशासकीय समितीच्या सर्वच्या सर्व अटी आम्ही पूर्ण करू, असे एमसीएने आपल्या पत्रात म्हटले होते. परंतु रात्री दहानंतर फटाके वाजवण्याच्या परवानगीचे मुंबई पोलिसांचे पत्र यासोबत जोडण्यात आले नव्हते. याबाबत एमसीएचे सचिव नितीन दलाल म्हणाले की, ‘‘आम्ही सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. शरद पवार यांनी या आठवडय़ात ही परवानगी मिळेल, असे आश्वासन दिले होते. परंतु अंतिम सामना बंगळुरूलाच ठेवणार असल्याच्या आयपीएल प्रशासकीय समितीच्या निर्णयाविषयी मी अनभिज्ञ आहे.’’
आता मुंबई इंडियन्सला घरच्या मैदानावर वानखेडे स्टेडियमवर अनुक्रमे २३ आणि २५ मे रोजी दोन सामने खेळायचे बाकी आहेत. याशिवाय ३० मे रोजी ‘क्वालिफायर-२’ हा सामना होणार आहे. ‘एलिमिनेटर’चा सामना २८ मे रोजी क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे.
आयपीएल प्रशासकीय समितीने घातलेल्या अटींची पूर्तता करताना एमसीएने सिनेअभिनेता शाहरूख खानवरील बंदी उठवून त्याला अंतिम सामन्यासाठी वानखेडेवर प्रवेशाची परवानगी दिली होती.
‘प्ले-ऑफ’चे वेळापत्रक
दिनांक सामना स्थळ
२७ मे क्वालिफायर-१ ईडन गार्डन्स, कोलकाता
२८ मे एलिमिनेटर ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई<br />३० मे क्वालिफायर-२ वानखेडे स्टेडियम, मुंबई
१ जून अंतिम फेरी एम. चिन्नास्वामी, बंगळुरू