करोनाच्या तडाख्यामुळे यंदाच्या वर्षी IPL ची स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. २९ मार्चपासून नियोजित असलेली IPL स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. तशातच IPL स्पर्धा आता होणार की नाही याबाबतही साशंकता निर्माण झाली आहे. पण मागच्या वर्षी मात्र आजच्या दिवशी आंद्रे रसलने धमाकेदार खेळी करून दाखवली होती. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने सलग दुसऱ्या सामन्यात विजयाची नोंद केली होती. किंग्ज इलेव्हन पंजाब संघावर त्यांनी २८ धावांनी मात केली होती. २१९ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेला पंजाबचा संघ २० षटकात १९० धावांपर्यंतच मजल मारु शकला होता.

असा रंगला होता सामना –

नितीश राणा, रॉबिन उथप्पा आणि मधल्या फळीत आंद्रे रसेलने केलेल्या फटकेबाजीमुळे कोलकाता नाईट रायडर्स संघाने किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात २१८ धावांपर्यंत मजल मारली. रॉबिन उथप्पा आणि नितीश राणा या जोडीने दमदार खेळ केला. दोन्ही फलंदाजांनी तिसऱ्या विकेटसाठी ११० धावांची शतकी भागीदारी केली. नितीश राणाने ३४ चेंडूत ६३ धावा केल्या. उथप्पानेही ६७ धावांची खेळी केली. त्यानंतर कोलकाता १८० पर्यंत मजल मारेल असा अंदाज होता, पण आंद्रे रसेलने १७ चेंडूत ४८ धावा कुटल्या आणि कोलकात्याला २०० चा टप्पा ओलांडून दिला.

डोंगराएवढं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पंजाबच्या संघाची सुरुवात खराब झाली. मयांक अग्रवाल आणि डेव्हिड मिलर यांनी चौथ्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी रचली. मात्र पियुष चावलाने मोक्याच्या क्षणी मयांक अग्रवालचा त्रिफळा उडवत कोलकात्याचं आव्हान कायम राखलं. मयांकने ३४ चेंडूत ५८ धावांची खेळी केली. अखेरच्या षटकात मिलर आणि मनदीप सिंह जोडीने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. मिलरने ५९ धावांची खेळी केली. पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.