स्पॉट-फिक्सिंग प्रकरणामुळे आयपीएल गोत्यात अडकले आहे आणि त्यामध्ये अडकले आहेत ते संघाचे मालक. चेन्नई सुपर किंग्जचे मालक आणि बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन आता भलतेच अडचणीत सापडले आहेत आणि अहंपणा नमवत त्यांनी आपली बाजू मांडण्यासाठी पहिल्यांदा प्रसारमाध्यमांना बोलावले. श्रीनिवासन हे प्रसिद्धीपराङ्मुख व्यक्तिमत्त्व, पण त्यांचा अपवाद वगळला तर अन्य संघमालकांना मात्र प्रसिद्धीच्या वलयापासून लांब राहता आलेले नाही. ही प्रसिद्धीलोलुप मंडळी त्यासाठीच आयपीएलच्या व्यासपीठावर आली का, हा प्रश्न सर्वासमोर पडतो. आयपीएलच्या निमित्ताने उद्योगपती आणि बॉलीवूड क्रिकेटच्या कवेत आले, त्याचा बाजार झाला आणि मैदानाबरोबरच मैदानाबाहेरही मनोरंजनाला सुरुवात झाली. या मिळालेल्या व्यासपीठाच्या ‘चान्स’वर संघमालकांनी ‘डान्स’ करत प्रसिद्धी मिळवली. त्यामध्ये कधी मिठीची मिठास होती, कधी पाटर्य़ाची नशा होती, कधी हुकूमशाहीचा तिखटपणा होता, तर कधी कुत्सितपणा, तुरटपणा.. पण ध्येय एकच- प्रसिद्धी.
कोलकाता नाइट रायडर्सचा मालक शाहरुख खान तर अशा गुर्मीत वावरतो की, माझ्यापेक्षा जास्त क्रिकेट कोणाला कळत नाही. प्रशिक्षक जॉन बकनन यांच्याशी त्याचा वाद झाला आणि संघात दुही माजली. भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी संघावर टीका केल्यावर ‘तुम्ही संघ विकत घ्या आणि चालवून दाखवा’ असे म्हणत शाहरुखने हेकेखोरपणाचा कळस केला. याच शाहरुखने गेल्या हंगामात वानखेडेवर धिंगाणा घातला आणि आपण किती बीभत्स आहोत, हे दाखवून दिले.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे मालक मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी पैशांचा ‘पटियाला’ पेग भरून खेळाडू विकत घेतले, पण ‘स्मॉल’ पेगची झिंगही त्यांना चढली नाही. त्यांचा संघ जेवढा गाजला नाही, त्यापेक्षा कितीतरी पटीने त्यांच्या पाटर्य़ा गाजल्या. पार्टीतले खेळाडूंचे हिडीस, बीभत्स नाच, मद्यपानाबरोबर ललनांच्या गराडय़ात अडकलेले खेळाडू साऱ्यांनीच पाहिले.  गेल्या हंगामात तर ल्यूक पोमर्सबॅचने एका विदेशी तरुणीची मद्यधुंद अवस्थेत असताना छेड काढली आणि तिच्या मित्राला मारहाण केली. या वेळी संघमालकांचा पुत्र सिद्धार्थने प्रकरण दाबले. ल्यूकसारख्या संन्याशाला फाशी दिली जात असल्याचे सिद्धार्थच्या वक्तव्यातून प्रतीत होत होते. बॉलीवूडमधील तारका, मॉडेल्स यांच्यामुळे बंगळुरूच्या संघापेक्षा संघमालक जास्त गाजले. बंगळुरूचा संघ जिंकल्यावर अभिनेत्री दिपिका पदुकोणचे सिद्धार्थने खुलेआम चुंबन घेतले होते.
कोचीच्या संघावरून झालेला वाद हा मंत्र्याच्या राजीनाम्यापर्यंत गेला, अखेर या संघाला फ्रँचायजी शुल्क न भरल्याने बाद ठरवण्यात आले, तर डेक्कन चार्जर्सचे खेळाडू सामनानिश्चिती प्रकरणात सापडल्यावर त्यांच्या संघावर बंदीची कुऱ्हाड कोसळली.
 किंग्ज ईलेव्हन पंजाबच्या संघात दम नसला तरी लोक सामना पाहायचे ते संघमालकीण प्रीती झिंटासाठी. जिंकल्यावर ही कोणाला ‘झप्पी’ देणार, याचीच खमंग चर्चा व्हायची. आपल्याबरोबरच आपल्या चित्रपटांना प्रसिद्धी मिळवून देणे प्रीतीला चांगलेच जमले, तर दुसऱ्या हंगामात पंजाबचा सहमालक मोहित बर्मनला दक्षिण आफ्रिकेत चोप मिळाला तो महिलेची छेड काढल्याप्रकरणी.
राजस्थान रॉयल्सचा संघ गाजवला तो कर्णधार शेन वॉर्नने. ‘कुछ मिठा हो जाए..’ असे म्हणत त्याच्या चुंबनांनी मैफल सजवली. संघमालकीण शिल्पा शेट्टी हिला क्रिकेटमधील किती कळते माहिती नाही, पण खेळाडूंना मिठी मारण्यात तीही मागे नसते.
मुंबई इंडियन्सचे संघमालकांनी तर वानखेडे स्टेडियममध्ये ‘लिफ्ट’ बसवण्याचा घाट घातला होता, पण मुंबई क्रिकेट असोसिएशन्सच्या पदाधिकाऱ्यांनी त्याला विरोध केला आणि मुकेश अंबानींचा हा प्रयत्न फसला. मालकीणबाईंचा दुसऱ्या हंगामात ‘मेकओव्हर’ झाला आणि मुंबई इंडियन्सचेच खेळाडू त्यांच्यावर फिदा झाले. कधी हरभजन सिंग आणि किरॉन पोलार्डने विजयानंतर अंबानी बाईंना दिलेल्या ‘झप्प्या’ खूप गाजल्या.
पुणे वॉरियर्सचे मालक सुब्रतो रॉय यांनी चक्क बीसीसीआयलाच धारेवर धरले. बीसीसीआयला बऱ्याच धमक्या दिल्यानंतर त्यांनी अखेर आयपीएलमधून आपला संघ काढून घेतला आणि बीसीसीआयचे प्रायोजकत्वही रद्द केले.
दिल्ली डेअरडेव्हिल्स हा संघ जीएमआर कंपनीचा. पण यांच्या मालकांनी क्रिकेटपेक्षा जास्त काहीच कमावले नाही आणि गमावलेही नाही.
चेन्नईचा संघ आतापर्यंत कसल्याच वादात नव्हता, पण या वर्षीचे ‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरण, संघमालक श्रीनिवासन यांच्या जावयाला झालेल्या अटकेने सारे गढूळ झाले; इथपर्यंत की आयपीएलचे पाणी चाखायला कोणीही तयार नाही. श्रीनिवासन यांच्या इंडिया सिमेंट या कंपनीने सुरुवातीला गुरुनाथला संघाचा सीईओ दाखवला, संघाबरोबर त्याची ऊठबस होती, पण त्याच्यावर आरोप झाल्यावर संघाला कोणतीही इजा पोहोचू नये म्हणून त्याची ही ओळख फक्त मानद सदस्य म्हणून दाखवली.
खेळाडू हे खेळाचे सर्वस्व असतात, पण आयपीएलमध्ये खेळाडूंपेक्षा हे संघमालक अधिक प्रसिद्ध झाले. त्यांच्याशिवाय या लीगला काही अर्थच नाही, असा आव त्यांचा असतो. अर्थात पैसे त्यांनीच टाकले आहेत, पण सवंग पद्धतीने वागणारे हे संघाचे खरेच ‘मालक’ आहेत की ‘मारक’, हा प्रश्न पडतो. जिथे संघमालकांचे वागणे सवंग लालसेचे, प्रसिद्धीलोलुप, किळसवाणे, हेकेखोर, हुकूमशहासारखे आहे, तिथे खेळाडूंना पूर्णपणे दोष देता येईल का? जर मालकांचा खेळाडूंवर चाप नसेल तर गैरप्रकाराचा पायाच ते रचतायत. खरे तर हे मालक संघाचे पालक असतात, त्यामुळे आपल्या पाल्यासमोर आपण असे वागून त्यांच्यापुढे कोणते उदाहरण ठेवायचे, याचा विचार संघमालकांनी करायला हवा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा