मायकेल क्लार्क, मर्लान सॅम्युअल्स, रॉबिन उथप्पा यांच्यासह अनेक अव्वल दर्जाच्या क्रिकेटपटूंचे कौशल्य पाहण्याची संधी पुणेकरांना सात एप्रिलपासून मिळणार आहे. आयपीएल स्पर्धेतील येथे होणार सामने सात एप्रिलपासून सुरू होत आहे.
गहुंजे येथील सुब्रतो रॉय सहारा स्टेडियमवर हे सामने होणार आहेत. गतवर्षी तेथे झालेल्या आयपीएल सामन्यांना प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला होता. यंदाही तशीच अपेक्षा केली जात आहे. गतवर्षी या सामन्यांना मिळालेल्या प्रेक्षकांच्या प्रतिसादापेक्षा तेथे झालेल्या इंग्लंड व भारत यांच्यातील ट्वेन्टी-२० सामन्यास कमी प्रतिसाद मिळाला होता. आयपीएल सामन्यांमध्ये अनेक देशांचे अव्वल खेळाडू भाग घेत असल्यामुळे पुणेकर क्रिकेट चाहते खऱ्या अर्थाने या सामन्यांचा आनंद घेतात हा गतवर्षी अनुभव पहावयास मिळाला होता.
पुण्यात यंदा हे सामने होतील की नाही याबाबत शंका निर्माण झाली होती, मात्र सहारा परिवार व महाराष्ट्र क्रिकेट संघटना यांच्यातील वाद मिटल्यामुळे हे सामन्यांच्या अनिश्चिततेवर पडदा पडला आहे व पुन्हा क्रिकेट चाहत्यांना खेळाचा आनंद घेण्याची संधी मिळणार आहे.
सात एप्रिल रोजी पुणे वॉरियर्स व किंग्ज इलेव्हन पंजाब हा सामना होणार आहे तर ११ एप्रिल रोजी पुणे व राजस्तान रॉयल्स हा सामना होईल. १७ एप्रिल रोजी पुणे व सनराईज हैदराबाद हा सामना होणार आहे. भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाबरोबर पुण्याचा सामना येथे ३० एप्रिल रोजी होईल. विराट कोहली याच्या रॉयल चॅलेंजर्सबरोबर पुण्याचा सामना येथे २ मे रोजी घेण्यात येणार आहे.
पुणे वॉरियर्स व कोलकाता नाईट रायडर्स हा सामना ९ मे रोजी होईल. ११ मे रोजी पुणे वॉरियर्स व मुंबई इंडियन्स हा सामना होणार आहे. त्यानिमित्ताने पुणेकरांना सचिन तेंडुलकरचा खेळ पाहण्याची संधी मिळणार आहे. पुणे व दिल्ली डेअरडेव्हिल्स हा सामना १९ मे रोजी होणार आहे.
पुणे वॉरियर्स संघाकडून मायकेल क्लार्क, वेन पार्नेल, ल्युक राईट, केन रिचर्ड्सन, कॅल्युम फग्र्युसन, मर्लान सॅम्युअल्स, जेरोमी टेलर, मिचेल मार्श, तमिम इक्बाल या परदेशी खेळाडूंचे कौशल्य पहावयास मिळणार आहे. श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्युज व अजंता मेंडीस यांचाही या संघात समावेश आहे. भारतीय खेळाडूंपैकी भुवनेश्वरकुमार, अशोक दिंडा, मुरली कार्तिक, अभिषेक नायर, श्रीकांत मुंढे, आशिष नेहरा यांच्याकडून चमकदार खेळाची अपेक्षा आहे.
या सामन्यांकरिता २५० रुपये (ईस्ट स्टँड), ५०० रुपये (वेस्ट स्टँड), १ हजार रुपये (नॉर्थ स्टँड), १५०० रुपये (साउथ पॅव्हेलियन), २ हजार रुपये (नॉर्थ पॅव्हेलियन), २५०० रुपये (साउथ पॅव्हेलियन) असे तिकीट दर ठेवण्यात आले आहेत.

Story img Loader