इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेमुळे जगभरातल्या खेळाडूंमधली कटुता कमी होऊन आक्षेपार्ह शेरेबाजी नियंत्रणात आली आहे, असे मत भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने व्यक्त केले. या स्पर्धेमुळे विविध देशांचे क्रिकेटपटू एकमेकांचे मित्र झाले आहेत, साहजिकच वैर नाहीसे झाल्यामुळे खेळभावना जोपासली जाते असे धोनीने पुढे सांगितले. एका खासगी कंपनीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने धोनी आणि धडाकेबाज ख्रिस गेल एकत्र आले होते. त्या वेळी धोनी बोलत होता.
‘जंटलमन्स गेम असे क्रिकेटचे वर्णन होते. आम्ही त्याच पद्धतीने खेळायचा प्रयत्न करतो. आम्हालाही प्रत्येक सामना जिंकायचा असतो. मात्र ‘जिंकण्यासाठी वाट्टेल ते’ हा आमचा दृष्टिकोन नसतो. हलक्याफुलक्या वातावरणात प्रतिस्पर्धी खेळाडूंशी बोलण्यात काहीच गैर नाही. जगभरात खेळल्या जाणाऱ्या ट्वेन्टी-२० लीग स्पर्धामुळे आंतरराष्ट्रीय खेळाडूंमधली वैरभावना कमी झाली आहे. यामुळेच शेरेबाजीला आळा बसला आहे’, असे धोनीने सांगितले.
विविध देश, प्रांताची संस्कृती समजून घेण्यास लीगमुळे मदत होते. प्रवास आणि सरावादरम्यान खेळाडूला माणूस म्हणून समजून घेता येते. आयपीएल स्पर्धेदरम्यान मी भारतीय खेळाडूंशी बोलत नाही. कारण त्यांच्या संघाच्या नियमांनुसार ते उचित ठरत नाही. मात्र एरव्ही ज्या खेळाडूंशी संवाद झाला नसता, त्यांच्याशी सौहार्दाचे संबंध तयार झाले आहेत, असे धोनीने स्पष्ट केले.

Story img Loader