आयपीएलचे ३० एप्रिलनंतरचे सामने राज्याबाहेर खेळवा, असे आदेश बुधवारी उच्च न्यायालयाने बीसीसीआयला दिले. आयपीएल सामन्यांवर उच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीदरम्यान हा निकाल देण्यात आला. आयपीएलचे सामने महाराष्ट्राबाहेर हलवल्याने दुष्काळाचा प्रश्न सुटणार नसला तरी सामन्यांसाठी लागणारे पाणी दुष्काळग्रस्त भागांना पुरविल्यास ही समस्या काही प्रमाणात आटोक्यात येऊ शकते, असे यावेळी न्यायालयाने म्हटले. आयपीएलचे सामने हलवून पाण्याचा प्रश्न सुटणार नाही, असा बीसीसीआयचा दावा असला तरी आम्ही गंभीर परिस्थितीत असलेल्या दुष्काळग्रस्तांकडे डोळेझाक करू शकत नाही, असे न्यायलयाने म्हटले.
पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे महाराष्ट्रात आयपीएल स्पर्धेचे सामने खेळवण्याबाबतच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान बुधवारी बीसीसीआयने न्यायालयात दुष्काळग्रस्तांना पाच कोटींची मदत करणार असल्याची माहिती दिली. याशिवाय, लातुरमधील कोणत्याही दुष्काळाग्रस्त भागात ४० लाख लीटर पाणी पुरविण्याची तयारी यावेळी बीसीसीआयने दाखवली. आयपीएलसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यापैकी काही पाणी दुष्काळग्रस्त भागाला देण्यासाठी तयार आहात का असा सवाल मुंबई उच्च न्यायालायाने बीसीसीआयला विचारला होता. दरम्यान, आयपीएलमधील मुंबई आणि पुणे हे संघ मुख्यमंत्री सहाय्यता निधीला प्रत्येकी ५ कोटी देणार असल्याचे बीसीसीआयने न्यायालयात सांगितले.
या सुनावणीदरम्यान पुणे संघाच्या वकिलांनी त्यांच्या संघाचे सामने पुण्याबाहेर खेळविण्यास विरोध दर्शवला. हे सामने इतरत्र खेळवले गेल्यास संघाचा पाठिंबा कमी होईल, असा युक्तिवाद त्यांनी केला. आयपीएलची तिकीटे विकली गेली आहेत. याशिवाय, आयपीलमध्ये अनेक गुंतवणुकदारांचे व्यावसायिक हितसंबंध जोडले असल्याने आयपीएल सामने महाराष्ट्राच खेळवून देण्यात यावेत, अशी मागणी यावेळी बीसीसीआयने केली. पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी अन्य दीर्घकालीन पर्याय असल्याचेही बीसीसीआयने यावेळी सांगितले. दरम्यान, यावेळी याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी पैसे हा पाण्याला ठरू शकतो का, असा सवाल उपस्थित केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा