आयपीएल २०२१ स्पर्धेत कोलकात्यानं बंगळुरूला पराभूत करत प्लेऑफच्या दुसऱ्या फेरीत धडक मारली आहे. अंतिम फेरीत जाण्यासाठी दिल्लीशी लढत होणार आहे. असं असताना कोलकात्याचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. उत्तुंग आणि लांब षटकार मारत असल्याने गोलंदाज त्याला गोलंदाजी करताना विचारात पडतात. बंगळुरू विरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात आंद्रे रसेल खेळला नाही. या दरम्यान कोलकाता नाइट राइडर्सने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत रसेलनं लांब षटकार मारण्याचं गुपित सांगितलं. व्हिडिओत रसेल संघातील साथीदार वेंकटेश अय्यर आणि शाकिब अल हसन सोबत बोलत असताना त्याने ही बाब सांगितली.
“मी शारीरिक ताकद कायम ठेवण्यासाठी दिवसाला २० ते ३० पुशअप मारतो. कारण सामन्यात मी जो षटकार मारेल तो कमीत कमी १०० मीटर लांब किंवा त्यापेक्षा दूर असेल. मी कित्येक वर्षांपासून असं करत आहे. लांब षटकार मारण्यासाठी मला मेहनत घ्यावी लागते”, असं आंद्रे रसेलनं सांगितलं. “काही जण टायमिंग पाहून चेंडू सीमारेषेपार मारतात. पण मी पूर्ण लक्ष चेंडूवर केंद्रीत करतो. मी प्रत्येक चेंडू इतक्या जोराने मारतो की ती सीमेरेषेपार जाईल. त्याचबरोबर चेंडू इतक्या लांब जायला हवा की, दुसरा चेंडू मागावा लागेल”, असंही रसेल पुढे म्हणाला.
“मी ख्रिस गेलकडून खूप काही शिकलो आहे. मी सीमेरेषेवर बाद होण्यास घाबरतो. यासाठी चेंडू स्टेडियम मारण्यावर विश्वास ठेवतो. त्यामुळेच चेंडू स्टेडियममध्ये मारायला शिकलो आहे. मी हे गेलकडून शिकलो आहे. चेंडू इतक्या लांब मारायचा की, खात्रीशीर षटकार असला पाहीजे”, असं आंद्रे रसेलने सांगितलं.