भारतीय संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंत सध्या खराब फॉर्मात आहे. गेल्या काही मालिकांपासून त्याच्या बॅटमधून धावांचा ओघ अक्षरशः आटला आहे. यष्टींमागेही पंतची कामगिरी फारशी चांगली होत नसल्यामुळे, अनेकदा सामन्यादरम्यान त्याला सोशल मीडियावर टीकेचा भडीमार सहन करावा लागतो. अशा प्रसंगात आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघात ऋषभला मार्गदर्शन करणारे प्रवीण अमरे पंतच्या मदतीसाठी धावून आले आहेत.
अवश्य वाचा – अपयशी ऋषभ पंतची सुनील गावसकरांकडून पाठराखण
“२०१९ आयपीएलआधी पंत अशाच जुन्या फॉर्ममध्ये होता. मात्र दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळताना त्याने ४८८ धावा पटकावल्या. या काळात मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटींग यांनी पंतला चांगलं हाताळलं. तो कोणत्याही दबावाखाली येणार नाही याची काळजी आम्ही घेतली आणि त्याला त्याचा नैसर्गिक खेळ करण्याची मूभा दिली”, प्रसारमाध्यमांशी बोलत असताना अमरे यांनी आपली बाजू मांडली.
अवश्य वाचा – चौथ्या क्रमांकाचा प्रश्न सुटला, पंतचा पत्ता कट ! मुंबईकर श्रेयस अय्यरला पसंती
यावेळी बोलत असताना अमरे म्हणाले, “ऋषभही विराट कोहली आणि रोहित शर्मासारखाच फलंदाज आहे. त्याच्या खात्यात चांगले फटके आहेत. आपल्याला वेळेत चांगल्या फॉर्मात परतायचंय हे त्याला माहिती आहे. मात्र सध्याच्या घडीला आपल्या जुन्या फॉर्मात कसं परतायचं याबद्दल तो जरा संभ्रमात आहे. आपला आक्रमक खेळ करायचा की बचावात्मक खेळायचंय याबद्दल त्याच्या मनात संभ्रम आहे.” बांगलादेशविरुद्ध टी-२० मालिकेतही ऋषभची कामगिरी खराब होती. १४ नोव्हेंबरपासून दोन्ही देशांमध्ये कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेत आता पंतला संधी मिळते का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.