हैदराबाद : चांगल्या लयीत असलेला वेगवान गोलंदाज मुस्ताफिझूर रहमानशिवाय चेन्नई सुपर किंग्जचा संघ शुक्रवारी ‘आयपीएल’ मध्ये सनरायजर्स हैदराबादचा सामना करेल. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गेल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागणाऱ्या चेन्नईचा प्रयत्न या लढतीत विजयी पुनरागमनाचा राहील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही लीग मोठी असून कामगिरीत चढ-उतार असणे अपेक्षित आहे. असे चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने गेल्या सामन्यात मिळालेल्या पराभवानंतर सांगितले होते. त्यामुळे गतविजेत्यांना हैदराबादविरुद्ध चांगली कामगिरी करावी लागेल. चेन्नईमध्ये चांगल्या खेळाडूंची कमतरता नाही. मात्र त्यांनी कामगिरीत सातत्य राखणे अपेक्षित आहे, चेन्नईने आतापर्यंत खेळलेल्या तीनपैकी दोन सामन्यांत विजय मिळवला आहे. दुसरीकडे, हैदराबादच्या संघाने तीन सामन्यांपैकी अवघ्या एका सामन्यात विजय नोंदवला.

हेही वाचा >>>हार्दिकचे कर्णधारपद धोक्यात? क्रिकेटवर्तुळात चर्चा; माजी क्रिकेटपटूंमध्ये मतमतांतरे

रचिन, शिवमकडे लक्ष

ऋतुराज व त्याचा सलामीचा साथीदार रचिन रवींद्रला फिरकीचा सामना करण्यासाठी तयार राहावे लागणार आहे. महेंद्रसिंह धोनीने आठव्या क्रमांकाहून वरती फलंदाजीस यावे, असे चाहत्यांना वाटते. त्याने गेल्या सामन्यात १६ चेंडूंत नाबाद ३७ धावांची खेळी केली होती. शिवम दुबे व समीर रिझवी यांच्याकडून ‘विजयवीरा’च्या भूमिकेची अपेक्षा असून धोनी वरच्या स्थानी फलंदाजीस येणे कठीण दिसत आहे.

अभिषेक, क्लासनवर मदार

सनरायजर्स हैदराबादला घरच्या मैदानावर खेळण्याचा नक्कीच फायदा मिळेल. त्यांच्या फलंदाजांनी मुंबईविरुद्ध दुसऱ्या सामन्यात मोठी धावसंख्या उभारली होती. मात्र, सलामीवीर मयांक अगरवालने निराशा केली. हैदराबाद संघाच्या फलंदाजीची मदार ही युवा अभिषेक शर्मा, हेन्रिक क्लासन व ट्रॅव्हिस हेड यांच्या खांद्यावर असेल.

● वेळ : सायं ७.३० वा.

● थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, जिओ सिनेमा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl match 2024 chennai super kings vs sunrisers hyderabad sport news amy
Show comments