चेन्नई येथे सुरक्षा व्यवस्थेबाबत कोणतीही समस्या नसून तेथे आयपीएलचे सामने होणारच, असे केंद्रीय संसदीय कामकाज खात्याचे राज्यमंत्री व आयपीएलचे प्रमुख राजीव शुक्ला यांनी येथे सांगितले.
सिम्बायोसिस क्रीडा संस्थेतर्फे सिटी कापरेरेशनचे व्यवस्थापकीय संचालक व क्रीडा संघटक अनिरुद्ध देशपांडे यांना यंदाचा सिम्बायोसिस क्रीडाभूषण पुरस्कार शुक्ला यांच्या हस्ते देण्यात आला. या वेळी सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ.शां.ब मुजूमदार हे अध्यक्षस्थानी होते.
समारंभानिमित्ताने पत्रकारांशी संवाद साधताना शुक्ला म्हणाले, श्रीलंकेच्या खेळाडूंचा आयपीएलमधील सहभाग निश्चित आहे. त्यांच्या एकाही खेळाडूने आपण खेळणार नसल्याचे कळविलेले नाही किंवा सुरक्षा व्यवस्थेविषयी शंका व्यक्त केलेली नाही. अन्य परदेशी खेळाडूही या स्पर्धेत भाग घेत असतात. आयपीएलचे सामने जेथे जेथे होतात, त्या सर्व ठिकाणी अतिशय कडक पोलीस बंदोबस्त असतो. त्यामुळे खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेताना कसलीही अडचण येणार नाही.
सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीविषयी विचारले असता शुक्ला म्हणाले, सचिन हा अतिशय महान खेळाडू आहे. स्पर्धात्मक क्रिकेटमधून केव्हां निवृत्ती स्वीकारायची याचा निर्णय सर्वस्वी त्याने घ्यायचा आहे. निवड समिती त्याच्यावर कोणतेही दडपण आणणार नाही. वीरेंद्र सेहवाग हा सध्या फॉर्ममध्ये नसल्यामुळे त्याला दोन कसोटींमध्ये स्थान देण्यात आले नव्हते. संघात कोणाला घ्यायचे आणि कोणाला वगळायचे याचा निर्णय निवड समिती घेत असते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने यामध्ये कधीही ढवळाढवळ केलेली नाही.
पुरस्कार वितरणप्रसंगी शुक्ला यांनी सांगितले,की पुण्यात शिवछत्रपती क्रीडानगरी आहे. तेथे क्रीडा विद्यापीठ होण्यासाठी मी कसोशीने मदत करीन. क्रिकेटबरोबरच अन्य खेळांमधील खेळाडूंच्या मदतीसाठी अनिरुद्ध देशपांडे यांच्यासारखे अन्य संघटकांनी पुढाकार घेतला पाहिजे. आपल्या देशात ‘दुखापती व्यवस्थापन’ या विषयावर फारसे संशोधन केले जात नाही.
देशपांडे यांनी त्याकरिता संस्था स्थापन केली तर परदेशातील तज्ज्ञ आणण्याकरिता मी मदत करीन. देशपांडे हे बांधकाम व्यवसायातील तज्ज्ञ असल्यामुळे त्यांनी आपल्या अनुभवाचा फायदा क्रीडा क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी घेतला तर निश्चितपणे येथे अनेक ऑलिम्पिकपटू घडतील. सत्कारास उत्तर देताना देशपांडे म्हणाले,की आपल्या राज्यात क्रीडा क्षेत्रात पायाभूत सुविधांची कमतरता आहे. राज्य शासनाने त्याकरिता सहकार्य केले तर आम्ही त्याकरिता सर्व जबाबदारी उचलण्यास तयार आहोत.
राज्यात क्रीडा क्षेत्राकरिता विपुल नैपुण्य आहे. मात्र त्यांच्या विकासाकरिता शासनाकडून ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे. गुजरातमध्ये क्रीडा विद्यापीठ उभारण्यात येत आहे. त्याप्रमाणेच आपल्याकडे जर असे विद्यापीठ झाले तर येथून ऑलिम्पिक पदक विजेते तयार होतील.