IPL Media Rights Auction Updates : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) माध्यम हक्कांबाबत कालपासून(१२ जून) लिलाव सुरू आहे. आज (१३ जून) या लिलावाचा दुसरा दिवस असून पुढील पाच वर्षांसाठी जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्पर्धेचे हक्क कोणाकडे असतील हे पूर्णपणे स्पष्ट होईल. लिलावाच्या दुसऱ्या दिवशी टीव्ही आणि डिजिटल हक्क विकले गेले आहेत. २०२३ ते २०२७ या वर्षांसाठी हे हक्क दोन वेगवेगळ्या कंपन्यांनी ४४,०७५ हजार कोटी रुपयांना विकत घेतल्याचे म्हटले जात आहे. म्हणजे आयपीएल आता टीव्हीवर वेगळ्या चॅनेलवर आणि अॅप व वेबसाइटवर दिसेल. एकूण ४१० सामन्यांसाठी हे माध्यम हक्क विकण्याचे आल्याची माहिती मिळत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, आयपीएलचे टेलिव्हिजन हक्क सोनीला आणि डिजिटल हक्क वायाकॉमकडे (रिलायन्स) गेले आहेत. मात्र, अद्याप त्याची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.

आयपीएल २०२३ ते २०२७ या काळासाठी टेलीव्हिजन हक्क ५७.५ कोटी रुपयांना आणि डिजिटल हक्क ४८ कोटी रुपयांना विकले गेले आहेत. खरेदीदारांची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. टेलीव्हिजन हक्कांसाठी ४९ कोटी रुपये मूळ किंमत ठेवण्यात आली होती तर डिजिटल हक्कांची ३३ कोटी रुपये मूळ किंमत होती. दोन्ही पॅकेजेला अपेक्षेपेक्षा जास्त किंमत मिळाली आहे. आता पॅकेज-ए आणि पॅकेज-बी विकले गेले असल्यामुळे एका सामन्यासाठी मिळणारी किंमत १०५.५ कोटींवर पोहोचली आहे.

Story img Loader