मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या पुढील पाच हंगामांसाठीचे (२०२३ ते २०२७) प्रसारण हक्क प्राप्त करण्यासाठी चार विभागांमध्ये मिळून ४६ हजार कोटींची बोली लागली आहे. अ-विभागात समाविष्ट असणारे भारतीय उपखंडातील टीव्ही (प्रसारण) हक्क  डिझ्नी-स्टारने मिळवले असून ब-विभागात समाविष्ट असलेले भारतीय उपखंडासाठी डिजिटल माध्यमांचे हक्क व्हायकॉम १८ने प्राप्त केले आहेत.

अ आणि ब विभागातील प्रसारण हक्कांची लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली असली, तरी क आणि ड विभागातील प्रसारण हक्कांसाठी विविध समूहांमध्ये चढाओढ सुरू आहे. त्यामुळे मुंबईत सुरू असलेला हा ई-लिलाव एका दिवसाने लांबला आहे. भारतीय उपखंडातील टीव्ही (प्रसारण) हक्क मिळवण्यासाठी डिझ्नी-स्टार आणि सोनी यांच्यात चुरस होती. अखेरीस डिझ्नी-स्टारने २३,५७५ कोटी रुपयांची विजयी बोली लावली. त्यांनी एका सामन्यामागे ५७.५ कोटी मोजण्याची तयारी दर्शवली.

तसेच ब-विभागात समाविष्ट असलेले भारतीय उपखंडासाठी डिजिटल माध्यमांचे हक्क प्राप्त करण्याकरिता २०,५०० कोटी रुपयांची विजयी बोली लावण्यात आली. हे हक्क रिलायन्सच्या मालकीच्या व्हायकॉम १८ने मिळवले आहेत. त्यामुळे टीव्ही आणि डिजिटल माध्यमांचे प्रसारण हक्क प्राप्त करण्यासाठी एकत्रित ४४,०७५ कोटींची बोली लागली. क आणि ड विभागाचा लिलाव दुसऱ्या दिवशी पूर्ण होऊ शकला नाही.

सोमवारी लिलाव प्रक्रिया थांबवण्यात आली, त्यावेळी क-विभागात दोन हजार कोटींची अखेरची बोली लागली होती. क-विभागात डिजिटल माध्यमांमध्ये प्रत्येक हंगामात निवडक १८ सामन्यांच्या (सलामीचा सामना, अंतिम सामना, बाद फेरीचे सामने समाविष्ट) प्रसारण हक्कांचा समावेश आहे. मंगळवारी याच विभागावरून लिलावाला पुन्हा सुरुवात होईल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ड-विभागाच्या लिलावाला प्रारंभ होईल. या विभागामध्ये परदेशातील टीव्ही आणि डिजिटल हक्क समाविष्ट आहेत. २०१७मध्ये झालेल्या गेल्या प्रसारण हक्क लिलाव प्रक्रियेत स्टार इंडियाने १६,३४७.५ कोटी रुपयांसह पाच हंगामांसाठीचे (२०१८-२२) प्रसारण हक्क मिळवले होते. यंदा या रकमेत जवळपास तिपटीने वाढ झाली आहे. प्रसारण हक्कांच्या माध्यमातून ४७ ते ५० हजार कोटींची रक्कम अपेक्षित होती.