आयपीएलच्या सहाव्या पर्वाचा पडदा येत्या बुधवारी वर उठेल आणि सुरू होईल थरारनाटय़.. जवळपास दोन महिने मंतरलेल्या रात्रींमध्ये सारे क्रिकेटविश्वच मश्गुल असेल.. खेळाडू कोणत्याही देशाचा असो, तो आपल्या संघात आहे म्हणजे आपला आणि जर संघच नसेल तर कोणतेही दडपण न घेता क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटण्याची संधी आयपीएलमध्ये मिळते.. आयपीएल म्हणजे काय? ..तर क्रिकेटपटूंचा कुंभमेळा! आयपीएलच्या छायेखाली क्रिकेटविश्वातील मातब्बर खेळाडू एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून खेळतात, ते कोणत्या देशाचे आहेत, हा भेद तिथे नसतोच, तर कधी कधी आपल्याच देशाच्या खेळाडूंविरोधात उभे ठाकतात आणि तेव्हाच त्यांची खरी कसोटी लागते. यंदाच्या मोसमाची ३ एप्रिलला धडाक्यात सुरुवात होत आहे आणि उत्सुकता असेल ती सहाव्या विजेतेपदावर कोण नाव कोरेल याची.
आयपीएलमध्ये यावेळी काही विचित्र योगायोग पाहायला मिळतील. एकेकाळी आंतरराष्ट्रीय स्तरावर एकमेकांशी शत्रूत्व पत्करणारे रिकी पाँटिंग आणि हरभजन सिंग हे दोन्ही खेळाडू एकाच संघात खेळताना दिसतील. दुसरीकडे पाँटिंग आणि सचिन तेंडुलकर या क्रिकेटविश्वातल्या दोन दिग्गजांची फलंदाजी एकाच वेळी पाहण्याचा योग क्रिकेटरसिकांना अनुभवायला मिळेल. त्याचबरोबर यावेळी सर्वात महागडा ठरलेला ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल हा देखील मुंबई इंडियन्स याच संघात असून त्याच्यासाठी भरलेल्या पैशाच्या ‘पतियाळा पेग’ची नशा चढणार का, याची उत्सुकता साऱ्यांनाच असेल. सनरायजर्स हैदराबाद या नवीन संघात कुमार संगकारा आणि डॅरेन सॅमी हे क्रिकेट जगतातील दोन नावाजलेले कर्णधार एकत्र दिसणार आहेत.
आयपीएल म्हटले की डोळ्यांपुढे सर्वप्रथम येतो तो फलंदाज ख्रिस गेल. कारण गेल्या काही वर्षांमध्ये त्याची वादळी फलंदाजी हा आयपीएलच्या लोकप्रियतेचा केंद्रबिंदू ठरला आहे. आयपीएलमध्ये ५०पेक्षा जास्त सरासरी असलेला तो एकमेव फलंदाज आहे, यावरूनच आयपीएलमध्ये गेल काय धुडगूस घालतो, हे समजता येईल. गेलबरोबर शेन वॉटसन, युसूफ पठाण, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, गौतम गंभीर, अॅडम गिलख्रिस्ट, सुरेश रैना, विराट कोहली या फलंदाजांनी आतापर्यंत ही स्पर्धा गाजवली आहे. गोलंदाजीमध्ये मुंबई इंडियन्सचा लसिथ मलिंगा हे सर्वात प्रभावी अस्त्र ठरलेले आहे, त्याच्याएवढे सातत्य कोणालाही दाखवता आलेले नाही. जॅक कॅलिस हा आतापर्यंतचा सर्वात दर्जेदार अष्टपैलू खेळाडू ठरला आहे. या नावाजलेल्या खेळाडूंबरोबर मनीष पांडे, शादाब जकाती, नमन ओझा, स्वप्नील अस्नोडकर, मनदीप सिंग, मनप्रीत गोणी, हरमीत सिंग यासारखे हिरेही भारताच्या खाणीत आयपीएलमुळे दृष्टीस पडले
आहेत.
गेल हा कितीही दर्जेदार फलंदाजी करत असला तरी त्याला एकदाही त्याच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला विजेतेपद जिंकवून देता आले नाही. क्रिकेट जगतात यशस्वी ठरलेला महेंद्रसिंग धोनी आयपीएलमध्येही यशस्वी ठरताना दिसत असून त्याने दोनदा संघाला विजेतेपद मिळवून दिले आहे. राजस्थान रॉयल्सने पहिल्या वर्षी जेतेपद पटकावले असले, तरी त्यानंतर मात्र त्यांची कामगिरी जास्त बहरलेली नाही. डेक्कन चार्जर्सने २००९मध्ये जेतेपद पटकावले होते, पण आता तो संघच स्पर्धेत उरलेला नाही. गेल्या वर्षी कोलकाता नाइट रायडर्सने विजेतेपद पटकावून साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. मुंबई इंडियन्सचा एकंदर चमू पाहिला तर हा संघ आतापर्यंत एकदाही विजेतेपद का पटकावू शकलेला नाही, हे कळत नाही. भारतीय कर्णधाराच्या नेतृत्वाखाली संघाला विजेतेपद मिळणार नाही, अशी बहुतेक संघाची धारणा असावी आणि त्यामुळेच त्यांनी पाँटिंगला कर्णधारपद बहाल केले असावे. किंग्ज इलेव्हन पंजाब, पुणे वॉरियर्स, दिल्ली डेअरडेव्हिल्स या तीन संघांची कामगिरी विजेतेपद पटकावण्याच्या दृष्टीने झालेली नाही. यंदाची स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी राज्यात श्रीलंकेच्या खेळाडूंना प्रवेशबंदी केल्याने संकट ओढावले होते, पण आयपीएलच्या कार्यकारिणी समितीने वेळापत्रकात बदल करून ही समस्या सोडवली आहे.
आयपीएल ही बीसीसीआयसाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी ठरलेली आहे. आयपीएलनंतर बऱ्याच देशांनी लीगचे आयोजन केले खरे, पण त्या स्पर्धाना आयपीएलएवढा पैसा आणि प्रसिद्धी मिळवता आलेली नाही. पण गेल्या काही वर्षांमध्ये आयपीएलची प्रसिद्धीही कमी होताना दिसत आहे. कारण गेल्या पाच वर्षांमध्ये लोकांना वेगळे काही पाहायला मिळालेले नाही, त्यामुळे आता आयपीएलचा लोकांना कंटाळा आलेला दिसतो. कधी कोणता सामना आहे, संघात कोणते खेळाडू आहेत याची जेवढी ओढ, उत्सुकता, उत्कंठा पाच वर्षांपूर्वी लोकांमध्ये होती, ती आता फारच कमी झालेली दिसते. आता समोर जर सामना सुरू असेल आणि वेळ असेल तर तो पाहायचा, एवढे साधे गणित आयपीएलचे झाले आहे. खास वेळ काढून आयपीएल बघणाऱ्यांची संख्या फारच कमी झालेली दिसते. त्यामुळे आयपीएल ही कोंबडी यापुढेही सोन्याचे अंडे देतच राहील का, हे सांगता येणार नाही. सध्या बीसीसीआयने स्पर्धेसाठी सुट्टय़ांचा कालावधी निवडल्याने यावेळी कदाचित आयपीएलला चांगला प्रतिसाद मिळेल, पण जर चांगला प्रतिसाद मिळाला नाही, तर बीसीसीआयला नक्कीच या स्पर्धेचा विचार करावा लागेल.
आयपीएलने क्रिकेटला काय दिले, या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. प्रत्येक आयपीएलनंतर खेळाडूंच्या दुखापती बळावतात आणि देशाचे प्रतिनिधित्व या स्पर्धेनंतर त्यांना करता येत नाही, हे साऱ्यांनीच पाहिले आहे. आयपीएलमुळे युवा खेळाडू करोडपती झाले, पण त्यामुळे त्यांनी शिक्षण सोडले आणि त्यांचे पाय आता जमिनीवर राहिलेले नाहीत, त्याचबरोबर स्थानिक स्पर्धाही त्यांच्यासाठी महत्त्वाच्या राहिलेल्या नाहीत. आयपीएल कुठेतरी क्रिकेटच्या मुळावर नक्कीच उठताना दिसते. पण ‘सब कुछ पैसा’ असलेली ही स्पर्धा जोपर्यंत नफ्यात आहे तोपर्यंत चालूच राहील. स्पर्धेपूर्वीच काहीसा रंग चढलेला आहे. सामने सुरू झाल्यावर कैफ वाढेल, अजून रंग चढेल, क्रिकेटविश्व या रंगात न्हाऊन निघेल. खेळाडू, संघ मालक मालामाल होतील, पण यामध्ये क्रिकेट आणि दर्दी रसिकांच्या हाती काय लागेल, याचे उत्तर मिळत नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा