भारतीय क्रिकेटरसिकांना आता इंडियन प्रीमियर लीगचे वेध लागले आहेत. ३१ मार्च पासून आयपीएलचा यंदाचा हंगाम सुरू होणार आहे. दरम्यान, आयपीएलच्या नियमात बदल होणार असल्याची बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने आयपीएलमध्ये काही बदल करायचं ठरवलं आहे. बीसीसीआय असे काही बदल करणार आहे, जे बदल सामन्याचा निकाल बदलू शकतात. आतापर्यंत आयपीएलमधील सामन्यात नाणेफेक होण्याआधी प्रतिस्पर्धी संघांचे कर्णधार सामन्यातील त्यांच्या संघांच्या अंतिम ११ खेळाडूंची यादी जाहीर करत होते. नाणेफेक होण्याआधी मॅच रेफरींकडे अंतिम ११ खेळाडूंची यादी सोपवली जात होती. परंतु आयपीएलच्या आगामी हंगामात यात बदल पाहायला मिळू शकतो.
आयपीएलमध्ये आता नाणेफेक झाल्यानंतर संघांचे कर्णधार अंतिम ११ खेळाडूंची यादी जाहीर करू शकतील. क्रिकइन्फोने याबाबतचं वृत्त प्रकाशित केलं आहे. त्यांच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, आता दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेक झाल्यानंतर त्यांची प्लेईंग ११ लिस्ट रेफरींकडे सोपवू शकतात. म्हणजेच आता अनेक कर्णधार नाणेफेक करण्यासाठी जाताना त्यांच्यासोबत दोन याद्या घेऊन जाऊ शकतात. ते आधी फलंदाजी करणार आहेत किंवा गोलंदाजी करणार आहेत यानुसार त्यांच्या आवडीच्या अंतिम ११ खेळाडूंची निवड करू शकतात. त्यामुळे एखादा कर्णधार नाणेफेक हरला तर तो प्लेईंग ११ मध्ये अखेरच्या क्षणी बदल करू शकतो.
दरम्यान, असा निर्णय घेणारी आयपीएल ही जगातली पहिली लीग नाहीये. याआधी दक्षिण आफ्रिकेतल्या टी-२० लीगमध्ये असा नियम पाहायला मिळाला आहे. या फ्रेंचायझी टुर्नामेंटमध्येदेखील संघ टॉसनंतर प्लेईंग ११ ची घोषणा करत होते. या लीगमध्ये कर्णधार १३ खेळाडूंची यादी घेऊन जायचे. त्यानंतर नाणेफेक झाल्यानंतर त्यापैकी ११ खेळाडूंची निवड करत होते. आपण आधी फलंदाजी करणार आहोत की, गोलंदाजी यानुसार अंतिम ११ खेळाडूंची निवड केली जात होती.
हे ही वाचा >> सुनील गावसकरांना अजित वाडेकरांनी बाथरुममध्ये कोंडलं होतं… कारण वाचाल तर हैराण व्हाल
…तर पाच धावांची पेनल्टी लागणार
याशिवाय आयपीएलच्या आगामी मोसमात इतरही अनेक बदल पाहायला मिळू शकतात. जर एखाद्या संघाने निर्धारित वेळेत त्यांची षटकं पूर्ण केली नाहीत. तर त्यांच्यावर ओव्हर पेनल्टी लावली जाईल. अशात ३० यार्डांच्या बाहेर केवळ चारच खेळाडू ठेवता येतील. तसेच जर एखादा क्षेत्ररक्षक अथवा यष्टीरक्षक एखादी अनावश्यक हालचाल करत असेल तर त्या संघाला पाच धावांची पेनल्टी ठोठावली जाईल किंवा तो चेंडू डेड घोषित केला जाईल.