बॉलीवूडमध्ये गालावर पडणा-या खळीसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री प्रिती झिंटाने किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाचे सदस्य झालेल्या खेळाडूंचे स्वागत केले आहे. बॉलिवूडमधून दूर असलेली प्रिती आयपीएल सामन्यांच्या दरम्यान, किंग्ज इलेव्हनच्या संघासोबत मैदानात चांगलीच सक्रिय दिसते. मात्र किंग्ज इलेव्हन पंजाबची मालकीण व अभिनेत्री प्रीती झिंटा नुकत्याच पार पडलेल्या इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) च्या दहाव्या सत्रासाठीच्या लिलावा वेळी मात्र ती अनुपस्थित होती. आयपीएल या देशातील सर्वात लोकप्रिय ट्वेन्टी-२० स्पर्धेसाठीच्या आगामी दहाव्या पर्वासाठीच्या खेळाडूंचा लिलाव सोमवारी बंगळुरूमध्ये पार पडला. प्रितीच्या संघाच्या व्यवस्थापकाची भूमिका पार पाडण्याची जबाबदारी घेतलेला सेहवाग पंजाबच्या संघाकडून या लिलावामध्ये उपस्थित असल्याचे दिसले. बंगळुरमध्ये पार पडलेल्या लिलावामध्ये प्रिती उपस्थित नसली तरी आपल्या संघासोबत असल्याचे दाखवून देण्यासाठी ती ट्विटरवर सक्रिय असल्याचे दिसून आले. प्रितीने ट्विटरच्या माध्यमातून संघामध्ये निवडलेल्या खेळाडूंचे स्वागत केले आहे.
This year I am busy so could not make it but @virendersehwag is there to handle the auction & cricket ops. #IPLAuction https://t.co/5zWf2nCEzV
— Preity zinta (@realpreityzinta) February 20, 2017
आयपीएलच्या लिलावादरम्यान संघामध्ये सामिल झालेल्या प्रत्येक खेळाडूचे प्रिती ट्विट करुन स्वागत करत होती. दरम्यान, सोशल मिडीयाच्या माध्यमातून आयपीएलच्या लिलावामध्ये सहभागी झालेल्या प्रितीला एका नेटिझनने सहभागी न होण्याचे कारण देखील विचारले. क्रिकेट आणि खेळाडूंविषयी अधिक अनुभव असून तुम्ही आयपीएल लिलावामध्ये उपस्थिती का लावली नाही? असा प्रश्न प्रितीला नेटिझनने विचारला होता. यावर प्रितीने इतर कामामध्ये व्यग्र असल्याचे सांगितले. यावर्षी मी व्यग्र असल्यामुळे लिलावाच्या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही, पण विरेंद्र सेहवाग चांगल्या पद्धतीने माझी कमतरता भरुन काढेल, असा विश्वास प्रितीने व्यक्त केला.
भारताचा माजी सलमीवीर विरेंद्र सेहवाग किंग्ज इलेव्हन पंजाबच्या व्यवस्थापकाची भूमिका बजावताना दिसत आहे. त्याच्या उपस्थितीमध्ये पंजाबच्या संघाने इंग्लडच्या इऑन मॉर्गनला मूळ किंमतीवर म्हणजेच २ कोटी रुपयाला आपल्या संघात सामिल करुन घेतले. तर राहुल तेवतियासाठी मुळ किंमतीपेक्षा १५ लाख जास्त मोजत २५ लाखाची बोली लावत आपल्या संघात सामिल करुन घेतले. मुळ किंमत १० लाख रुपये असणाऱ्या तमिळनाडूच्या रणजी खेळाडू टी. नटराजनसाठी पंजाबने चक्क ३ कोटी मोजले आहेत. तर भारताच्याच वरुण अॅरोनला ३० लाख या मुळ किंमतीपेक्षा अधिक बोली लावत २.८ कोटी रुपयांना आपल्या ताफ्यात सामिल करुन घेतले. न्यूझीलंडचा मॅट हेन्री मुळ किंमतीसह ५० लाखात किंग्ज इलेव्हनच्या संघाचा सदस्य झाला आहे.