आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांचा कार्यकारी सहाय्यक मोहम्मद अक्रम सैफी याच्यावर संघनिवडीच्या बदल्यात वेश्यांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशच्या राज्यस्तरीय संघात खेळाडूंची निवड करण्याच्या बदल्यात सैफी याने वेश्याची मागणी केली असल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. न्यूज१ या हिंदी वृत्तवाहिनीने बुधवारी या संबंधीचे वृत्त प्रसारित केले.

या वृत्तानुसार, अक्रमने राहुल शर्मा या खेळाडूला संघातील निवडीबाबत लाच किंवा ‘त्या’ स्वरूपातील भेटी पोहोचवण्याची मागणी केली होती. तसेच, बीसीसीआयच्या विविध वयोगटातील स्पर्धांसाठी अक्रम खेळाडूंना बनावट वय प्रमाणपत्र पुरवण्यासही मदत करत असल्याचा आरोप राहुलने केला आहे.

त्या वृत्तवाहिनीने अक्रम याची एक रेकॉर्डेड फोन टेप प्रसारित केली. या टेपमधील संभाषणात अक्रम राहुलला उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनमधील काही गोष्टी सांगत असून संघातील समावेशासाठी नवी दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये वेश्या पाठवून देण्याबाबत सांगत असल्याचे दिसले. याशिवाय, काही सामन्यानंतर तुझे नाव संघात समाविष्ट केले जाईल, असेही अक्रम दुसऱ्या एका रेकॉर्डिंगमध्ये सांगत असल्याचे दिसले.

यानंतर काही इतर खेळाडूही या वृत्तवाहिनीवर आले होते. त्यांनीही या संघटनेत संघनिवडीसाठी भ्रष्टाचार चालत असल्याचा आरोप केला. या संघटनेत अक्रमला कोणतेही पद नसले तरीही या साऱ्याचा सूत्रधार तोच असल्याचेही या खेळाडूंनी आरोप केले.

दरम्यान, अक्रम याने हे आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे. जर त्या खेळाडूने माझ्याकडे वेश्या पाठवली असे त्याचे म्हणणे असेल, तर तो उत्तर प्रदेश संघाकडून अद्याप का खेळला नाही? असा उलट सवाल अक्रमने केला. राजीव शुक्ला यांच्याकडून मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

Story img Loader