आयपीएलचा अकरावा हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना, काल या नवीन हंगामासाठी अँथम साँगचं प्रसारित करण्यात आलं. यंदा आयपीएल सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क हे Star Sports या वाहिनीकडे आहेत. त्यामुळे क्रीडा प्रसारणात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या या वाहिनीने यंदाच्या अँथममध्येही आपला वेगळेपणा जोपासला आहे. ये देश हे वीर जवानोंका या सुप्रसिद्ध हिंदी गाण्याच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या हंगामाचं अँथम साँग रचण्यात आलेलं आहे.

हिंदी, तामिळ, बंगाली, कन्नड आणि तेलगू या पाच भाषांमध्ये हे गाणं प्रसिद्ध केलं जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा चित्रपट दिग्दर्शक डॅन मेस, संगीत दिग्दर्शक राजीव भल्ला, वोकलिस्ट सिद्धार्थ बसरुर यांनी या थीम साँगवर काम केलेलं आहे. या आयपीएल अँथम साँगच्या माध्यमातून भारतातील कोट्यवधी क्रीडा रसिक पुन्हा एकदा आपल्या आवडत्या स्पर्धेचा आनंद घेऊ शकतील असं वक्तव्य, बीसीसीआयचे विशेष कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी म्हटलं आहे.