भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या विरोधात बिहार क्रिकेट संघटनेचे सचिव आदित्य वर्मा यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) नीतिमूल्ये समितीकडे पत्र पाठविले असून श्रीनिवासन यांच्याकडून परिषदेच्या नियमावलींचे उल्लंघन झाले असल्याची तक्रार केली आहे.
वर्मा यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार श्रीनिवासन यांनी अध्यक्षपदाचा त्याग केला आहे. न्यायालयाने श्रीनिवासन यांना मंडळाचा कारभार पाहण्यास मनाई केली आहे. या संदर्भात आजपर्यंत तीन वेळा मी आयसीसीला कळविले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने श्रीनिवासन यांना मंडळाच्या अध्यक्षपदापासून दूर केले असले तरी आयसीसीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीस उपस्थित राहण्यास त्यांना मनाई केली नव्हती. ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे असे वर्मा यांनी म्हटले आहे. त्यांनी पुढे म्हटले आहे की, आयसीसीचे पदाधिकारी श्रीनिवासन यांच्याच प्रभावाखाली कारभार करीत आहेत. या संदर्भात नीतिमूल्ये समितीने कायदेशीर आधार घेत कारवाई करावी व क्रिकेट खेळाची प्रतिष्ठा राखावी.
मंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा आपली नियुक्ती करण्यास परवानगी द्यावी अशी विनंती श्रीनिवासन यांनी न्यायालयास केली होती मात्र न्यायालयाने ही विनंती फेटाळली होती. तसेच मुदगल समितीने श्रीनिवासन व अन्य बारा जणांविरुद्धच्या भ्रष्टाचार प्रकरणाची सखोल चौकशी करावी असेही न्यायालयाने कळविले आहे.

Story img Loader